Garade Dam Water Storage Pudhari
पुणे

Garade Dam Water Storage: गराडे धरण १०० टक्के भरले; सासवडच्या पिण्याच्या पाण्याची चिंता संपली

कऱ्हा नदीत विसर्ग सुरू

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे सासवड शहराला पाणीपुरवठा करणारे ६५.३७ दशलक्ष घनफूट क्षमतेचे गराडे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे सासवड शहरासह परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

धरण भरल्यानंतर सध्या कऱ्हा नदीत तसेच पश्चिम भागातील सर्व बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे बंधारे भरल्यानंतर अतिरिक्त पाणी नाझरे धरणाकडे सोडण्यात येणार असल्याची माहिती गराडे पाटबंधारे शाखेचे अभियंता अविनाश जगताप यांनी दिली.

गराडे धरण हे सासवड शहराच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख जलस्रोत आहे. या धरणातून सासवड शहर, गराडे, कोडीत खुर्द, कोडीत बुद्रुक, चांबळी, हिवरे बोपगाव आदी गावांना नियमित पाणीपुरवठा केला जातो. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे यंदाच्या हंगामात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुसळधार पावसामुळे चतुर्मुख महादेव मंदिर परिसर, दरेवाडी, थापे-वारवडी, रावडेवाडी, हनुमानवाडी आणि मठवाडी परिसरातील ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. या सर्व पाण्याचा ओघ कऱ्हा नदीमार्गे गराडे धरणात आल्याने धरण अल्पावधीतच तुडुंब भरले. धरण भरल्याचा आनंद स्थानिकांनीही साजरा केला.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे आणि सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे पूजन करण्यात आले. या वेळी जालिंदर जगताप, शिवाजी बापू जगदाळे, सुनील तात्या जगदाळे, संदीप कदम, दत्तात्रय जगदाळे, बाळासाहेब यादव, भानुदास रावडे, सुभाष जगदाळे, प्रभाकर जगदाळे, संजय रावडे, शांताराम रावडे, संदीप जगदाळे, लक्ष्मण जगदाळे, श्रेयश शेवाळे, अमोल जगदाळे, ओंकार जगदाळे, सोमनाथ जगदाळे, सुजल जगदाळे आदी उपस्थित होते.

तालुक्यात पाऊस मिलिमीटरमध्ये

पुरंदर तालुक्यात बुधवार (दि. ८) झालेल्या पावसाची माहिती तहसील कार्यालयातील लिपिक सोमनाथ आव्हाळे यांनी दिली. सासवड २५, जेजुरी ३०, भिवडी ५४, परिंचे २८, राजेवाडी २७, वाल्हा २२, शिवरी २१, कुंभारवळण ७. या पावसामुळे पुरंदर तालुक्यातील जलस्रोतांना नवसंजीवनी मिळाली असून, पिण्याचे पाणी, शेती आणि भूजलपातळी या तिन्ही आघाड्यांवर दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागातील चिंता मिटली

पुरंदरच्या पश्चिम भागातील पाझर तलाव, बंधारे आणि विहिरीही भरून वाहू लागल्याने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटला आहे. नागरिकांसह गुरे-ढोरे, बकऱ्या आणि वन्यप्राण्यांसाठीही मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. शिवाय शेतीसाठी आवश्यक पाणीसाठा निर्माण झाल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT