पुणे : पुण्यात कोर्टाबाहेर गुंडावर हल्‍ला करताना हल्लेखोर. इन्‍सेट छायाचित्रात घटनास्‍थळावर पडलेले पिस्‍तूल. 
पुणे

Pune Crime News | पुण्याच्या कोर्टाबाहेर गुंडांनी छाटला गुंडाचा हात

भरदिवसा थरार; भावाच्या खुनाचा सूड घेण्यासाठी खुनाचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे : खुनाच्या गुन्ह्यात चार दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीवर बुधवारी चौघा जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार केले. त्यात त्याचा हात मनगटापासून छाटला गेला. अंगठाही पंजापासून वेगळा झाला. मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. कात्रज) हा या थरारक घटनेत गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, ही घटना शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरातच घडली. या रक्तरंजित हल्ल्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड दहशत पसरली होती.

२० एप्रिल २०२५ रोजी कात्रजमधील संतोषनगर परिसरात जमिनीच्या आणि आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण याचा खून झाला होता. या प्रकरणातील जामीन मिळालेला आरोपी मंदार बुधवारी खटल्याच्या कामकाजासाठी न्यायालयात आला होता. दुपारी सव्वाएकच्या सुमारास चार हल्लेखोरांनी त्याला घेरले. दोन पिस्तुलांतून त्‍याच्‍यावर गोळीबाराचा प्रयत्न केला. त्यातील एक गोळी मंदारच्या पाठीला चाटून गेली. मात्र, पिस्तुलातून उर्वरित गोळ्या न सुटल्याने हल्लेखोरांनी कोयते आणि पालघनने त्याच्यावर हल्ला चढवला. मंदारवर एकामागोमाग एक वार करण्यात आले. हल्लेखोरांनी सपासप केलेल्या हल्ल्यात मंदारचा हात मनगटापासून छाटला गेला. मंदार रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या अवस्थेतही त्याच्या डोक्यावर आणि शरीरावरही गंभीर वार करण्यात आले. काही क्षणांतच हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.

या खटल्‍यातील मंदारच्‍या वकील अ‍ॅड. शुभांगी परुळेकर यांनी पुढाकार घेत गंभीर जखमी मंदारला रिक्षातून रुग्णालयात नेले. प्रवासादरम्यान तो बेशुद्ध पडू नये, यासाठी त्यांनी त्याला सतत बोलते आणि जागे ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती चिंताजनक असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात सहा जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

'आम्ही कात्रजचे बाप आहोत...'

हल्लेखोरांनी पसार होताना दहशत माजवत 'आम्ही कात्रजचे बाप आहोत... बाप!' असे ओरडत ते दुचाकीवरून पसार झाले. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT