Who Is Nilesh Ghaiwal Pudhari
पुणे

Who Is Nilesh Ghaiwal: भररस्त्यात अंधाधुंद गोळीबार करून 'गेम' ते बीडपर्यंत नेटवर्क, कोण आहे नीलेश घायवळ?

Gangster Nilesh Ghaiwal Network: पुण्याबरोबरच, अहिल्यानगर, धाराशिव, बीडचाही डॉन

पुढारी वृत्तसेवा

अशोक मोराळे, पुणे

Who Is Nilesh Ghaiwal Pune Gangster history in Marathi

पुणे : गुंड नीलेश घायवळ जरी विदेशात फरार झाला असला, तरी राज्यातील काही राजकीय मंडळींची मात्र त्याने झोप उडवली हे नक्की. कोथरूडमध्ये त्याच्या पंटरांनी गोळीबार केला अन् तो पोलिसांच्या रडारवर आला. चौकशीत तो विदेशात असल्याचे पुढे आले. मग प्रश्न निर्माण झाला, एवढा मोठ्या गुंडाला पासपोर्ट मिळालाच कसा ? पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने खोटी माहिती देऊन आडनावात बदल केला. एवढेच कमी की काय म्हणून त्याचा मोठा भाऊ सचिन याला शस्त्रपरवाना देण्यासाठी खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याची बाब उजेडात आली. मग काय तो राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडाला. त्यातूनच गोळीबाराचा आवाज थेट कोथरूडच्या महात्मा सोसायटीपासून धाराशिव, बीड आणि विधानसभेपर्यंत पोहचला होता.

नीलेश घायवळ याने हे काही एका दिवसात साध्य केले नाही. त्याला साथ मिळाली ती पांढरपेशी पुढार्‍यांची. आपली नियमबाह्य उदिष्ट साधण्यासाठी काही पुढारी घायवळसारख्या गुंडांना आपल्या पदरी पोसत असतात. घायवळदेखील त्यापैकीच एक. एकदा का पुढार्‍यांचा आश्रय मिळाला की, अशा गुंडाचा उच्छाद वाढीस लागतो आणि त्यांच्याकडून शासकीय यंत्रणेचा हवा तसा वापर केला जातो. माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी घायवळप्रकरणी केलेले आरोप आणि नंतर राजकीय नेत्यांसोबत प्रसिद्ध झालेले त्याचे फोटो यावरून गुंड-राजकीय पुढारी यांच्यात लागेबांधे दिसून येतात. नीलेशला खादीची ताकद चांगलीच उमगली होती. त्यामुळे तो सतत काही मंत्र्यांसोबत वावरताना दिसत होता. थेट मंत्रालयापर्यंत त्याचा हा मुक्त वावर असल्याचे दिसून आले होते.

नीलेश मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा. त्याचे कुंटुंब कामाच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले. वडील कमिन्स कंपनीत कामाला होते, तर नीलेश हा वनाज कंपनीत कामाला होता. उच्चशिक्षित गुंड अशीदेखील नीलेशची ओळख आहे.

नीलेश गुन्हेगारी क्षेत्रात कधी आला?

साधारण 2000 च्या आसपास नीलेश हा गुन्हेगारी क्षेत्रात आला. नीलेश याची गजानन मारणे, रुपेश मारणे, संदीप शेलार यांच्याशी मैत्री होती. गजानन मारणेसोबत नीलेशने एकाची हत्या केली होती. या हत्येप्रकरणी दोघेही सात वर्ष तुरुंगात होते.

नीलेश गजानन मारणेत वाद का झाला?

वर्चस्व आणि पैशांच्या वादातून गजा मारणेच्या टोळीतून नीलेश बाहेर पडला आणि स्वतःची गुन्हेगारी टोळी तयार केली. त्याला आपल्या गुन्हेगारी वर्चस्वाचा अंदाज आला असावा. पोलिस रेकॉर्डनुसार, त्याच्या टोळीत 48 जण होते. काही कालावधीनंतर नीलेश आणि गजा या दोघातील संघर्ष विकोपाला गेला.

पोलिसांकडील उपलब्ध माहितीनुसार, नीलेश हा कोथरूड येथील गांधी भवन परिसरातून जात असताना गजाच्या टोळीतील पप्पू कुडले आणि त्याच्या साथीदारांनी नीलेशवर खुनी हल्ला केला. परंतु, सुदैवाने तो त्यातून बचावला. एके दिवशी पप्पू कुडलेचा भाऊ सचिन कुडले दत्तवाडी परिसरात आला असताना दहशत निर्माण करण्यासाठी सचिन कुडलेवर नीलेशच्या टोळीने अंधाधुंद गोळीबार केला. दांडेकर पुलापर्यंत हा गोळीबार सुरू होता. यात एक गोळी सचिन कुडलेला लागली. त्यामध्ये सचिन कुडलेचा खून झाला. त्यामुळे शहरातील टोळीयुद्ध आणखीनच भडकले.

याच दरम्यान, गजाच्या पत्नीने नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. त्यात त्या निवडूनही आल्या. अशा पद्धतीने गजाची जोरदार राजकीय एंट्री झाली. त्यानंतर नीलेशच्या जवळ असलेल्या गुंड पप्पू गावडेचा जमिनीच्या वादातून गजा मारणेच्या टोळीने 2014 मध्ये लवळे गावाजवळ खून केला. तर गुंड अमोल बधेलाही फिल्मीस्टाईलने गाठून वैकुंठ स्मशानभूमीपाशी गोळ्या झाडून गजा मारणेच्या टोळीने ठार केले. यातील अनेक प्रकरणात या दोन्ही टोळ्यातील प्रमुख आणि त्यांच्या साथीदारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

पुणे पोलिसांनी टोळ्याविरुद्ध कारवाईचा फास आवळताच नीलेश घायवळसह अनेक गुंडानी शहराबाहेरचा रस्ता धरला. त्यातच घायवळ याने आपल्या मूळ गावी जाऊन, जामखेड, खर्डा, कर्जत आणि शेजारी लागून असलेल्या धाराशिव व बीड जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण केले. त्यातच त्याला काही राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ मिळाले. घायवळ याने पवनच्चकी प्रकल्पात जमिनीच्या बाबत हस्तक्षेप करून काही कामे आपल्याकडे घेतल्याचे देखील स्थानिक नागरिक सांगतात. त्यातून त्याने मोठा पैसा कमाविला असल्याची माहिती आहे.

घायवळ पुण्यात कमी आणि या परिसरात जास्त वास्तव्यास होता. त्याचे वाढते प्रस्थ आणि हस्तक्षेपामुळे भुम तालुक्यातील एका गावच्या कुस्तीच्या फडात स्थानिकाने त्याच्या कानशिलात लगावली होती. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. घायवळच्या घरात पोलिसांना जमिनीच्या संदर्भातील खरेदीखत आणि साठेखत मिळून आले आहेत. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील जमिनीची कागदपत्रे असल्याचे पोलिस सांगतात. नीलेशला राजकीय एंट्रीचे वेध लागल्याचे बोलले जाते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात तो राजकारणात प्रवेश करण्याची संधी पाहत होता.

कोथरुडमधील गोळीबार प्रकरण काय ज्यामुळे नीलेश घायवळ अडचणीत आला?

- कोथरूडमध्ये टोळक्याने एकावर गोळीबार केला.

- त्याच रात्री एकावर कोयत्याने वार केले.

- हे गुंड नीलेश घायवळ टोळीचे असल्याचे पोलिस तपासात समोर आले.

- घायवळच्या सांगण्यावरून त्यांनी हा गोळीबार केल्याचे पोलिस सांगतात

- याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

- पोलिसांनी नीलेश घायवळचा शोध सुरू केला तेव्हा तो विदेशात असल्याचे निष्पन्न झाले.

- रेकॉर्डवरील गुंडाला पासपोर्ट कसा मिळाला, असा सवाल समोर

- चौकशीत प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली, तसेच आडनावात बदल केला

- पुणे पोलिसांचा अहिल्यानगर येथे तपास

- पासपोर्ट मिळविताना खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल

- पासपोर्ट रद्द करण्यासाठी पासपोर्ट विभागाकडे पत्रव्यवहार

- घायवळबाबत पोलिसांकडून लूक आऊट नोटीस जारी

- पोलिसांकडून कोथरूड येथील घायवळच्या कार्यालय घरी झडती

- पोलिसांना पिस्तुलाची दोन काडतुसे, रिकाम्या पुंगळ्या मिळाल्या.

- पिस्तुलाची काडतुसे मिळाल्याप्रकरणी, आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

- घायवळ व कुटुंबीयांची बँकखाती गोठवली

- बँक खात्यात आढळले 38 लाख 26 हजार

- घायवळच्या घराची, ऑफिसची पोलिसांकडून झडती

- जमिनीची कागदपत्रे, साठेखत, खरेदीखत सापडले

- गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची सचिन घायवळ याच्या शस्त्रपरवान्यासाठी शिफारस

- पुणे पोलिसांनी शस्त्रपरवाना दिला नाही.

- सचिन घायवळसह सहा जणांवर गुन्हा दाखल

- नीलेश घायवळ, सचिन घायवळ या दोघांवर गुन्हा

- नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT