पुणे; पुढारी वृत्तसेवा : टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात डांबरीकरणानंतर दुसर्या दिवशीच खोदाई सुरू केल्याची घटना जागरूक पुणेकरांनी उजेडात आणल्यानंतर खोदाई बंद ठेवण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बाजीराव रस्त्यावर डांबरीकरण केल्यानंतर काही दिवसांतच खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या या उलट्या गंगेमुळे नागरिकांच्या कररूपी पैशाची नासाडी होत आहे.
शहरात गेल्या वर्षी केलेल्या खोदाई आणि निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे पुणेकरांना आजवर खड्ड्यांतूनच वाट काढावी लागली होती. यातून पुणेकरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने विविध पॅकेजमध्ये शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, काही रस्त्यांचे डांबरीकरणही करण्यात आले आहे. तत्पूर्वी, विविध सेवावाहिन्या टाकण्यासाठी खोदाई करणे, रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामासह खोदाईचे डिजिटलायजेशनही करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून जलवाहिनीसह विविध सेवावाहिन्या टाकण्याचे काम डांबरीकरण करण्यापूर्वी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. एकदा डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण झाल्यानंतर पुन्हा खोदकाम करता येणार नाही. याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
त्यानंतर टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात डांबरीकरणानंतर दुसर्या दिवशीच जलवाहिनीसाठी खोदाई केली जात असल्याचे जागरूक पुणेकरांनी उजेडात आणले होते. त्यामुळे खोदाईचे काम तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठांनी सांगितले होते.
त्यानंतर महापालिकेच्या उलट्या गंगेचा प्रत्यय बाजीराव रस्त्यावर आला. या रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर काही दिवसांत या रस्त्यावरील गणराज हॉटेलजवळ शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खोदाई करण्यात आली. ही खोदाई कशासाठी करण्यात येत आहे? डांबरीकरणापूर्वी खोदाईचे काम का केले नाही? असे प्रश्न संबंधितांना 'पुढारी' प्रतिनिधीने विचारले असता कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. खोदाईनंतर खोदाई केलेला भाग डांबरीकरणाने बुजविण्यात आला. मात्र, एका दिवसातच हे डांबरीकरण खचल्याने वाहने आदळत आहेत.
डांबरीकरणानंतर विद्युत विभागाच्या कामासाठी खोदकाम करण्यात आल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत माहिती मागविण्यात आली असून, संबंधितांवर कारवाई केली जाईल.
विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका