तरुणावर कोयत्याने वार करून फोडली 20 ते 22 वाहने
वडगाव बुद्रुकमधील घटना, एकाला अटक; दोन अल्पवयीन ताब्यात
पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केले. त्यानंतर ‘आम्ही या परिसरातील भाई आहोत, आमच्या वाटेला जाणार्यांना आम्ही असेच मारणार’ म्हणत दहशत माजवून 20 ते 22 वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि.25) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागात घडली. (Pune News Update)
याप्रकरणी पोलिसांनी साई पांडुरंग उमाप (वय 18, रा. समर्थनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) याला अटक केली आहे. तर त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत ज्ञानेश शामराव संकपाळ (वय 27, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) याने सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकपाळ हा रविवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घराजवळ उभा होता. त्यावेळी आरोपी उमाप आणि त्याचे तिघे साथीदार तेथे आले. पूर्वीच्या वादातून संकपाळ याला शिवीगाळ करू लागले. उमाप आणि त्याच्या साथीदाराने संकपाळ याच्यावर कोयत्याने वार केला. संकपाळच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, हा प्रकार संकपाळ याच्या चुलत्याच्या निदर्शनास येताच त्यानी त्याला घरात ओढळे. चार आरोपींनी मोठ-मोठ्याने शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केली.
सहकारनगरमध्ये वाहनांची तोडफोड
सहकारनगरमधील जय गणेश मित्रमंडळ परिसरात सोमवारी (दि.26) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. प्राथमिक माहितीनुसार, आठ ते दहा वाहने फोडण्यात आली आहेत. दरम्यान, कोणत्या कारणातून ही वाहने फोडण्यात आली, हे मात्र समजू शकलेले नाही.