बेल्हे: राष्ट्रीय महामार्गालगत उभ्या असणार्या वाहनांमधील डिझेल चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या आळेफाटा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 15 लाख 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेशकुमार परमार (वय 48) हे ट्रक आळे (ता. जुन्नर) गावचे हद्दीत महालक्ष्मी फर्निचरसमोर उभा करून झोपले होते. त्या वेळी अज्ञातांनी त्या ट्रकमधून 200 लिटर डिझेल चोरून नेले होते.
याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की, अशाप्रकारे डिझेल चोरी करणारे संशयित हे एका ट्रक मधून डिझेल चोरी करण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गाने येणार आहेत.
पोलिसांनी त्वरित आळेफाटा चौक येथे नाकाबंदी नेमून हा ट्रक आल्यानंतर राजाराम परमार (वय 48) फिरोज खान (वय 28), कल्लू खाँ रूस्तम खाँ मन्सुरी (वय 38), विनोद सिंग (वय 28) आणि ओमप्रकाश बैरागी (वय 44) यांना ट्रकसह ताब्यात घेतले.
चौकशी केली असता त्यांनीच डिझेल चोरी केल्याचे कबूल केले. या पाच जणांकडून त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेला ट्रक व चोरून नेलेले डिझेल विक्री करून आलेले पैसे असा एकूण 15 लाख 25 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला.