पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एकावर कोयत्याने वार केले. तसेच, परिसरात दहशत निर्माण केली. हा प्रकार 3 ऑक्टोबर रोजी रात्री पत्राशेड झोपडपट्टी, चिंचवड येथे घडला. सनी ज्ञानू शिरसाठ (37, रा. पिंपरी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, कपाळ्या ऊर्फ आकाश काळे, बाळ्या ऊर्फ विजय काळे, इरफान शेख, सद्दाम, सोहेल आणि त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी आणि आरोपी इरफान व त्याचा मित्र बाबा रणदिवे यांच्यात पूर्वी वाद झाला होता. याबाबत सनी यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. कोरोना काळात बाबा रणदिवे याचा मृत्यू झाला. दरम्यान, 30 ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांच्या भाचीचा साखरपुडा होता.
या कार्यक्रमासाठी बाबा रणदिवे यांची पत्नी देखील आली होती. त्या वेळी फिर्यादी सनी यांनी बाबा रणदिवे याच्याबद्दल वक्तव्य केले. ही बाब समजल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी पत्राशेड येथे गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, कोयत्याने वार करून जखमी केले. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.