ओतूर: गत काही महिन्यात ओतूर आणि आजूबाजूच्या गावातील शेतकर्यांच्या शेतजमिनीतील विहिरींवरील विद्युत मोटारला जोडलेली महागड्या केबल चोरी करणार्या सहा जणाच्या टोळीला ओतूर पोलिसांनी जेरबंद केले. या आरोपींकडून एकूण 1 लाख 14 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.
केशव बबन काळे (रा. कुरकुंडी, ता. संगमनेर, जि. नगर), किशोर सुरेश काळे (रा. भोजदरी, संगमनेर, जि. नगर), राहुल विठ्ठल काळे (रा. भोजदरी, ता. संगमनेर, जि. नगर व दीपक तात्याबा डोके (रा. सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर) अशी अटक चोरट्यांची नावे आहेत.
तसेच या चोरट्यांकडून चोरीच्या विद्युत मोटारी व केबल विकत घेणार्या भंगार व्यावसायिक सोबरन राजाराम चौहान (रा. घारगाव, ता. संगमनेर, जि. नगर, मूळ रा. मध्यप्रदेश) व मेटल खरेदी व्यावसायिक विक्रमसिंग अमरसिंग राठोड (रा. आळेफाटा, मूळ रा. राजस्थान) यांनाही अटक करण्यात आली.
हद्दीतील शेतकर्यांच्या शेतातील विहिरीमधील विद्युत मोटारीचे केबल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास चालू असताना पोस्को कायद्यांतर्गत अटक आरोपी सराईत गुन्हेगाराकडे कसून चौकशी तसेच त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करता त्याने साथीदारांच्या मदतीने ओतूर, रोहकडी, खामुंडी परिसरातील शेतकर्यांच्या विहिरींमधील विद्युत मोटारींच्या केबल चोरी केल्याचे सांगितले.
तसेच ओतूर पोलिस ठाण्यात विहिरीतील मोटार केबल चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी 18 किलो वजनाच्या धातुच्या तारा, 5 हजार रुपये किंमतीच्या विद्युत मोटारीची काळी केबल, 100 रुपयांचे एक कटर, तसेच गुन्हा करताना वापरलेल्या दोन दुचाकी व एकूण 1 लाख 14 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक आरोपींना जुन्नर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी ओतूर व जुन्नर पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिस हवालदार बाळशीराम भवारी, नदीम तडवी हे अधिक तपास करीत आहेत.