गणेशोत्सवासाठी खरेदीचा सुपर संडे; सर्वत्र आनंदाचे, चैतन्याचे अन् उत्साहाचे वातावरण Pudhari
पुणे

Ganesh Chaturthi: गणेशोत्सवासाठी खरेदीचा सुपर संडे; सर्वत्र आनंदाचे, चैतन्याचे अन् उत्साहाचे वातावरण

बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झाली गर्दी

पुढारी वृत्तसेवा

Ganesh festival shopping 2025

पुणे: कोणी सजावटीच्या साहित्यांची तर कोणी इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत विद्युत माळा खरेदी करत होते... असे उत्साही, चैतन्यपूर्ण वातावरण रविवारी (दि. 24) बाजारपेठांमध्ये पाहायला मिळाले. गणेशोत्सवाच्या आधीचा शेवटचा रविवार असल्याने अन् सुटीचा दिवस असल्याने पुणेकरांची उत्सवाच्या साहित्य खरेदीसाठी लगबग पाहायला मिळाली अन् रविवार पेठेतील बोहरी आळी असो वा तुळशीबाग सगळीकडे प्रचंड गर्दी झाली. गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. पण, असे असले तरी पावसाच्या सरीतही प्रत्येकाने उत्साहाने साहित्य खरेदीवर भर दिला अन् रविवार हा खरेदीचा सुपर संडे ठरला.

गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस उरल्यामुळे सगळीकडे हर्षोल्हासाचे वातावरण रंगले आहे. मंगळवारी (दि. 26) हरतालिका पूजन आणि बुधवारी (दि.27) श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना असल्याने उत्सवासाठीच्या साहित्य खरेदीचे निमित्त साधत अनेकांनी सुटीचा दिवस सत्कारणी लावला. त्यामुळे बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी उसळली. रविवारी (दि.24) पावसाने काही प्रमाणातउघडीप दिल्याने गौरी-गणपती पूजनासाठी लागणार्‍या साहित्यांसह सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. Ganesh Chaturthi

सकाळपासूनच मंडई, रविवार पेठेतील बोहरी आळी, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता यासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग पाहायला मिळाली. रविवार पेठेतील बोहरी आळीत खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी झाली. हरतालिका पूजनासाठी लागणार्‍या साहित्यांची खरेदीही अनेकांनी केली. गणेशोत्सवाचा रंग बाजारपेठांमध्ये पाहायला मिळाला. पुणेकरांनी सहकुटुंब खरेदीचे निमित्त साधले.

साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग

मागील आठवड्यात शहराच्या सर्व भागांमध्ये पाऊस झाल्याने त्याचा परिणाम गणेशोत्सवाच्या साहित्य खरेदीवरही झाला होता. मात्र, आता काही प्रमाणात पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठेत खरेदीसाठीची गर्दी पाहायला मिळत आहे. रविवारी घरगुती गणेशोत्सवासाठी पूजेचे साहित्य, मखर, चौरंग, आसन, आभूषणे, विद्युत माळा, कारंजे, पडदे, फुलांची आरास अशा विविध प्रकारच्या साहित्याच्या खरेदीला प्राधान्य देण्यात आले. (Latest Pune News)

इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत विद्युत माळांपासून ते एलईडी लाईट्सपर्यंतच्या साहित्य खरेदीची लगबग पाहायला मिळाली. मिठाईच्या दुकानांमध्येही मोदकांसाठीची ऑर्डर देण्यासाठी गर्दी दिसून आली. शहराच्या विविध भागात श्रीगणेश मूर्तीच्या विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. रविवारी अनेकांनी श्रीगणेश मूर्तींची आगाऊ नोंदणी केली.

अन् झाली वाहतूक कोंडी...

गणेशोत्सवाआधीचा रविवार, त्यात पाऊस यामुळे बहुतांश जणांनी चारचाकी रस्त्यावर आणल्या होत्या. साहजिकच बाजारपेठेमध्ये विशेषत: बोहरी आळी, मंडई, लक्ष्मी रस्ता येथे खरेदीसाठी गर्दी झाल्याने रविवारी काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. पावसामुळे काहींनी चारचाकी वाहनांना प्राधान्य दिल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. बोहरी आळी, मंडई, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, छत्रपती श्री शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता येथे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, तर नदीपात्रातील रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आदी ठिकाणीही काहीसे असेच चित्र दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT