महापालिका 'इच्छुकां'मुळे मंडळांची सुगी; हजार ते लाखोंच्या वर्गणीमुळे वाढला गणेशोत्सवाचा उत्साह  File Photo
पुणे

Ganeshotsav Celebration: महापालिका 'इच्छुकां'मुळे मंडळांची सुगी; हजार ते लाखोंच्या वर्गणीमुळे वाढला गणेशोत्सवाचा उत्साह

वासापूजनापासून विविध कार्यक्रमांना सर्वपक्षीय आजी-माजींसह इच्छुकांची हजेरी

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: गणेशोत्सव आणि राजकारण, यांचे नाते घरातील गणपती सार्वजनिक झाला तेव्हापासून घट्टच आहे. त्यात निवडणुका म्हटली की सर्वांत आधी लक्ष जाते ते गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे. गणेशोत्सवासह राजकारणातही कार्यकर्त्यांचे महत्त्व अद्यापही टिकून असून, असे एकगठ्ठा कार्यकर्ते गणेशोत्सव मंडळांकडे उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पक्षांच्या

आजी- माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी मंडपाच्या वासापूजनापासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटा लावला आहे. गणेशोत्सवानिमित्त भेटीगाठी घेत मंडळाला हजारोंपासून ते लाख रुपयांपर्यंत वर्गणी जाहीर केली जात असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. (Latest Pune News)

गणेशोत्सवाच्या आडून आगामी महापालिका निवडणुकांचे मनुसबे रचले जात आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांत गणेशोत्सवाची स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. शहरातील सर्व मतदारसंघांत लहान-मोठ्या गणेश मंडळांना माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची फौज असलेल्या लोकप्रिय गणेशोत्सव मंडळांना घसघशीत देणग्या देऊन ढोल पथक, महाप्रसाद, मिरवणुकीसाठी साउंड सिस्टिम, मूर्तीकरिता पैसे, कार्यकर्त्यांना कुर्ते-पायजामे, कमानीसाठी जाहिरात, स्पर्धांकरिता पारितोषिक प्रायोजक, ढोल पथक, महाप्रसाद, मिरवणुकीसाठी साउंड सिस्टिम, चिमुकल्यांसह आबालवृद्धांच्या आकर्षणासाठी विशेष कार्यक्रमांच्या आयोजनासाठी आदी अनेक गोष्टी करण्यासाठी राजकीय पक्ष आणि नेते हातभार लावत असल्याचे चित्र आहे.

सहा प्रमुख पक्षांचे दहाहून अधिक इच्छुक

एका गणेश मंडळांत 100 ते 200 किंवा त्याहून अधिक तरुण व त्यांचे कुटुंबीय सहभागी होत असतात. त्यामुळे या गणेश मंडळांना आपलेसे करण्यावर इच्छुकांचा भर दिसत आहे. यामुळेच वर्गणीसाठी जाणार्‍या गणेश मंडळांना नाराज न करता त्यांना खूष करण्याचा प्रयत्न दिसत आहे.

यंदा प्रथमच पाच मोठे राजकीय पक्ष मैदानात उतरण्याच्या तयारीत असून, या राजकीय पक्षांमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. या सर्वच इच्छुकांना मंडळांनी खूष केल्याने मंडळांना दोन ते तीन लाख वर्गणी गोळा करणे सहजशक्य झाले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मंडळांसाठी विशेष आनंदाचा ठरणार आहे.

बाप्पाच्या अलंकारांची आगाऊ नोंदणी

चांदीचा मुकुट, हार, मूषक, कमळासह विविध अलंकारांबाबत मंडळांकडून विचारणा होऊ लागली आहे. चांदी तसेच घडणावळीचे दर याची सांगड घालत किती खर्च येईल, याचा अंदाज घेत कार्यकर्त्यांनी नियोजन सुरू झाले आहे.

यंदा चांदीचे दर एक लाखाच्या पार आहेत. मात्र, निवडणुका असल्याने इच्छुकांकडून मोठी वर्गणी मिळेल, या आशेने कार्यकर्त्यांनी गणरायाच्या अलंकारांची आगाऊ बुकिंगसुद्धा केली आहे. याखेरीज इच्छुकांनी चांदीच्या वस्तू भेटस्वरूपात देण्याच्या द़ृष्टीने तयारी केल्याची माहिती पुष्पम ज्वेलर्सचे संचालक जित मेहता यांनी दिली.

सार्वजनिक मंडळे दरवर्षी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. गणेश मंडळांना राजकीय पक्षांकडून काही मोठ्या अपेक्षा नसतात. मात्र, मंडळाशी निगडित किरकोळ कामे करण्यासाठी संबंधितांनी सहकार्य करावे, एवढीच माफक अपेक्षा कार्यकर्त्यांची असते. निवडणुका असतील तरच मंडळांकडून आग्रह करण्यात येतो. अन्य वेळी सर्व भार हा मंडळांच्या वर्गणीदारांवर अवलंबून असतो. याखेरीज बहुतांश इच्छुकही मंडळांना मदत करण्यास तयार असतात. त्यामुळे मंडळांना एकप्रकारे मोठा आर्थिक हातभार लागतो.
- आकाश मुसळे, राजर्षी शाहू चौक गणेशोत्सव मित्रमंडळ
राजकीय पक्षांच्या पदाधिकारी तसेच इच्छुकांना कार्यकर्ते जमविण्यासाठी मोठी दमछाक होते. मंडळाकडे कार्यकर्त्यांची मोठी साखळी असते. महापुरुष जयंती, राष्ट्रीय उत्सव अथवा दहीहंडीसारखे उत्सव एका दिवसात संपतात. मात्र, गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा होत असल्याने परिसरातील प्रत्येक जण व त्याच्या घरातील व्यक्ती उत्सवाशी जोडलेले असतात. त्यामुळे गणेशोत्सव हे आपल्या मतपेटीशी संपर्क साधण्याचे माध्यम असते, असे राजकीय व्यक्तीला वाटत असल्याने त्यांच्याकडून वर्गणीस्वरूपात मदत केली जाते.
- स्वप्निल जोशी, महात्मा गांधी वसाहत गणेशोत्सव मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT