पुणे : यंदाचा गणेशोत्सव १२ दिवस साजरा होणार आहे. २०१७ नंतर पुन्हा हा योग जुळून आला. याशिवाय हरितालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. १४) असल्याने यंदाच्या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोमवारी ब्राह्ममुहूर्ताला पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५१ वाजेपर्यंत घरगुती श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पूजन करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा माध्यान्हानंतर देखील करता येऊ शकते. अनंत चतुर्दशी शुक्रवारी (दि. २५) आहे.
सोमवारी (दि. १४) सूर्योदयाच्या वेळी हरितालिका तृतीया असेल. सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी तृतीया समाप्त होऊन त्यानंतर श्री गणेश चतुर्थी सुरू होईल. हरितालिका तृतीयेसाठी सूर्योदयव्यापिनी तृतीया आवश्यक असते, तर श्री गणेश चतुर्थीकरिता चतुर्थी तिथी माध्यान्हकालव्यापिनी असावी लागते. सोमवारी सूर्योदयकाली तृतीया आणि माध्यान्ही चतुर्थी असल्याने ही दोन्हीही व्रते एकाच दिवशी आलेली आहेत, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
हरितालिका आणि श्री गणेश चतुर्थीचे कर्ते वेगवेगळे असल्याने दोन्ही पूजांच्या वेळेबाबत भाविकांनी संभ्रम बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे तृतीया समाप्त होण्यापूर्वी किंवा समाप्त झाल्यानंतरही हरितालिकापूजन करता येईल. तसेच ७ वाजून ७ मिनिटांपूर्वी देखील श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता येईल.
यंदा तृतीया आणि श्री गणेश चतुर्थीच्या तिथींमध्ये क्षय किंवा वृद्धी नसल्याने गणेशोत्सवाचा कालावधी १२ दिवसांचा झाला आहे. तसेच हरितालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी येण्याचा योग २००६ आणि २००९ मध्ये आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. हरितालिकेचा उपवास सोमवारी (दि. १४) करून मंगळवारी (दि. १५) सोडावा तसेच ऋषिपंचमीचा उपवास असणाऱ्यांनी हरितालिकेची उत्तरपूजा करून त्यानंतर उपवास सोडावा आणि मंगळवारी ऋषिपंचमीचे व्रत नेहमीप्रमाणे करावे, असेही त्यांनी सांगितले.