उत्सवात करा स्वच्छतेचा जागर! मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांचे गणेश मंडळांना आवाहन File Photo
पुणे

Ganesh Festival: उत्सवात करा स्वच्छतेचा जागर! मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांचे गणेश मंडळांना आवाहन

महानगरपालिका यासाठी माहिती पत्रके गणेश मंडळांना देणार, अशी माहिती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी महानगरपालिका प्रशासन गणेश मंडळांना पूर्ण सहकार्य करणार आहे. गणेश मंडळांनी विविध देखावे सादर करताना पुणेकरांमध्ये स्वच्छतेचा पुरस्कार करावा. गाण्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा प्रसार करा. महानगरपालिका यासाठी माहिती पत्रके गणेश मंडळांना देणार, अशी माहिती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.

गणेशोत्सवाचे आयोजन, नियोजन व त्याची रूपरेषा ठरविण्याकरिता व उत्सव शांतता, शिस्तीने व उत्साहात पार पाडण्याच्या द़ृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, मनपा अधिकारी व पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक महानगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी (दि 21) आयोजित केली होती. (Latest Pune News)

या बैठकीला गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विविध सूचना केल्या. विविध देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुणेकर शहरात येत असतात. प्रामुख्याने मेट्रोच्या माध्यमातून हे नागरिक येत असतात. या नागरिकांना शहराची माहिती मिळावी यासाठी दिशादर्शक फलके लावण्यात यावी. तसेच नागरिकांना स्वच्छतागृहे कुठे आहेत याची देखील माहिती मिळावी. गर्दीच्या काळात महिलासुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने हाताळला जावा. तसेच मंडळांना विविध परवानग्या घेण्यासाठी एक खिडकी योजना तातडीने सुरू करण्यात यावी या मागण्यांसह अनेक मागण्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केल्या.

याला उत्तर देताना आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, अनेक पुणेकर हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. त्यामुळे त्यांना घरी जातांना त्रास होऊ नये यासाठी मेट्रो सेवा 2 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या उत्सवाच्या माध्यमातून चांगले विषय मंडळांनी हाताळावेत. पुण्यासाठी गणेशोत्सव महत्त्वाचा आहे.

नागरिकांना एकत्र आणणण्याची ताकद या उत्सवात आहे. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागणार नाही, यासाठी काळजी घ्या. मंडळात जर कुणी दारू पिऊन येत असेल तर अशा कार्यकर्त्यांना स्थान देऊ नका. उत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहोत. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी समाज विघातक प्रवृत्तींवर नजर ठेवावी असे आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केले.

गणेशोत्सवात मंडळांची फरफट थांबावी, यासाठी महापालिकेने गणेशोत्सवाची जबाबदारी एका वरिष्ठ अधिकार्‍यावर सोपवावी, अशी मागणी चलो पीएमसी’चे अमित सिंग, डॉ.कल्याणी मांडके, रेखा जोशी, विक्रांत लाटकर, सूरज बनसोडे यांनी बैठकीत केली.

मेट्रो रात्री 2 पर्यंत सुरू राहणार

देखावे पाहण्यासाठी पुण्यात आलेल्या नागरिकांना रात्री देखील घरी जाता यावे यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उशिरापर्यंत सुरू ठेवली जाणार आहे. नागरिक मेट्रोचा वापर प्रामुख्याने करत असल्याने उत्सव काळात मेट्रो रात्री 2 पर्यंत सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती राम यांनी दिली.

अधिकार्‍यांना देखील नाइट ड्यूटी

उत्सव काळात अधिकारी रात्री थांबत नाहीत. यामुळे तक्रारींचा निपटारा तातडीने होत नाही अशी तक्रार गणेश मंडळांनी केली होती. त्यामुळे या वर्षीपासून अधिकार्‍यांना देखील उत्सव काळात नाइटड्यूटी लावणार आहे. हे अधिकारी रात्री थांबून नागरिकांच्या व मंडळांच्या तक्रारी सोडवतील, असे आयुक्त म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT