Ganesh Chaturthi Date 2025 Sthapana Muhurat in Marathi
पुणे : आस गणरायाच्या आगमनाची, मंगलमूर्ती गजाननाच्या दर्शनाची... याच भावनेने बुधवारी (दि. 27) गणरायाचे आगमन होणार आहे. यावर्षी गणेश चतुर्थीला म्हणजेच बुधवारी श्री गणेश प्रतिष्ठापना आणि पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. यंदा भद्राकरण असले, तरीही नेहमीप्रमाणे ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजेच पहाटे 4 वाजून 50 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 53 मिनिटांपर्यंत कधीही आपल्या घरात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करता येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना माध्यान्हानंतर देखील करता येईल, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
गणेशोत्सवात उत्साह सगळीकडे पाहायला मिळत असून, श्री गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी दोन वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. प्रात:कालापासून माध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी प्रतिष्ठापना आणि पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टीकरण आदी वर्ज्य नाहीत.
याशिवाय गणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी गणेशमूर्ती आणायला पाहिजे, असा नियम नाही. श्री गणपतीची मूर्ती 8 ते 10 दिवस आधीसुद्धा आणून घरात ठेवता येते. श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी प्रतिष्ठापना करणे जमले नाही, तर पुढे कोणत्याही दिवशी प्रतिष्ठापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुढील वर्षी गणपतीपूजन करता येते, असेही दाते यांनी स्पष्ट केले.
पुढील वर्षी अधिकमास असल्याने श्री गणेशाचे आगमन उशिरा होईल. 14 सप्टेंबर 2026 रोजी श्री गणेश चतुर्थी असेल, अशी माहितीही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.
काही वर्षी गणेशोत्सव दहा दिवसांचा, तर काही वर्षी अकरा दिवसांचा असतो. त्याला असे विशिष्ट कारण नसते. मागील वर्षी गणेशोत्सव अकरा दिवसांचा होता, यंदाही गणेशोत्सव अकरा दिवस साजरा होणार आहे, अशी माहिती दाते यांनी दिली.
बुधवारी (दि. 27 ऑगस्ट) : श्री गणेश चतुर्थी या दिवशी पहाटे 4 वाजून 50 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 53 मिनिटांपर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.
रविवारी (दि. 31 ऑगस्ट) : गौरी आवाहन (सूर्योदयापासून सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रावर आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.)
सोमवारी (दि. 1 सप्टेंबर) - गौरीपूजन
मंगळवारी (दि. 2 सप्टेंबर) - गौरी विसर्जन (सूर्योदयापासून रात्री 9 वाजून 51 मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करावे.)
शनिवारी (दि. 6 सप्टेंबर) - अनंत चतुर्दशी.