खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : पानशेतजवळील आंबी गावच्या वरपेवाडी येथे विषारी गांधील माश्यांच्या हल्ल्यात प्रथमेश प्रकाश वरपे (वय 17, वरपेवाडी) हा तरुण जखमी झाला. वरपेवाडी येथील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या एका झाडावर गांधील माश्यांचे पोळे आहे. यापूर्वीही एका पाळीव जनावरांवर माश्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे गांधील माश्यांची या ठिकाणी दहशत निर्माण झाली आहे.
वरपेवाडी येथील विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या काकड आरती सोहळ्याची सांगता गुरुवारी सकाळी दहा वाजता काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर वारकरी, भाविक मंदिराच्या प्रांगणात गोळा झाले. त्या वेळी प्रथमेश हा घराकडे जात असताना अचानक गांधील माशीने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने ग्रामस्थांनी प्रथमेशला खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्यानंतर थोड्या वेळाने तो सावध झाला.
आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एस. पोकळे म्हणाले की, प्रथमेश याला दंश केलेल्या गांधील माशीत काही प्रमाणात विषारी द्रव्ये असावेत. त्यामुळे त्याच्या हाताला सूज येऊन हालचाल करणे अवघड झाले होते. तातडीने उपचार केल्यानंतर त्याला आराम मिळाला आहे. सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडलाधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले की, मधमाश्यांपेक्षा आकाराने गांधील माश्या मोठ्या आहेत. या माश्या नेमक्या कोणत्या प्रकारच्या आहेत, हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान, यापूर्वी देखील या माश्यांनी एका रेड्याचा चावा घेतला होता. त्या वेळी चार-पाच दिवस वेदनांनी रेडा सैरावैरा धावत होता.
गांधील माश्या आकाराने मोठ्या व लालबुंद रंगाच्या आहेत. मधमाश्यांपेक्षाही या माश्या विषारी आहेत. त्यामुळे ग्रामस्थांत दहशत पसरली आहे. या माश्यांचे पोळे तातडीने काढण्यात यावे.
– संतोष वरपे, ग्रामस्थ, वरपेवाडी-आंबी