पुणे: पुढारी वृत्तपत्र समूह आणि पुनीत बालन ग्रुपच्या वतीने आयोजित ‘गणाधीश नवोन्मेष’ स्पर्धेला पुण्यातील गणेश मंडळांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रमही आता वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे. सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील विजय तेंडुलकर नाट्यगृहात उद्या शनिवारी म्हणजे 20 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांकडून विविध विषयांवरील आकर्षक देखावे साकारले जातात. कोणी सामाजिक विषयांवर जिवंत देखावे यंदा साकारले तर कोणी ऐतिहासिक विषयांवरील देखावे साकारले. (Latest Pune News)
उत्सव काळात याच मंडळांसाठी पुढारी वृत्तपत्र समूह आणि पुनीत बालन ग््रुापतर्फे गणाधीश नवोन्मेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उत्कृष्ट देखावे, आदर्श मिरवणूक आणि महिला सन्मान अशा तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. उत्सवाच्या काळात परीक्षकांनी मंडळांकडे जाऊन देखाव्यांचे परीक्षण केले. तसेच मिरवणुकीनंतर मंडळांनी आपापल्या मंडळाच्या मिरवणुकीचे चित्रीकरण दै. ‘पुढारी’कडे पाठवले.
उत्कृष्ट देखावे आणि आदर्श मिरवणूक या गटांतील पारितोषिकप्राप्त मंडळांना शनिवारी गौरविण्यात येणार आहे. सांघिक भावनेला- कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, परिणामकारक देखावा उभा करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि तो घडवणाऱ्या कलाकारांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी ही स्पर्धा झाली.
उत्कृष्ट देखावा आणि आदर्श विसर्जन मिरवणूक या गटात पहिले पारितोषिक 51 हजार रुपये, दुसरे पारितोषिक 31 हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक 21 हजार रुपयांचे आहे. तसेच, या दोन्ही गटांत प्रत्येकी अकरा हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, माजी आमदार उल्हास पवार आणि स्पर्धेचे संयोजक, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन, पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी संगीत अन् नृत्याचा मिलाफ असलेला बहारदार कार्यक्रमही आयोजित केला असून नटरंग ॲकॅडमीचे जतीन पांडे आणि सहकलाकार गायनासह वैविध्यपूर्ण नृत्याविष्कारही सादर करणार आहेत. शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य आणि मराठी-हिंदी चित्रपटातील नव्या-जुन्या गाण्यांची मेजवानी कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. एकूण पंधरा कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
कार्यक्रम काय?
पुढारी वृत्तपत्र समूह आणि पुनीत बालन ग्रुपच्या वतीने आयोजित गणाधीश नवोन्मेष स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ.
पारितोषिके कोणाकोणाला?
उत्कृष्ट देखावे करणाऱ्या आणि आदर्श मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना.
पारितोषिकांचे स्वरूप काय?
या दोन्ही गटांसाठी पहिले पारितोषिक 51 हजार रुपयांचे, दुसरे पारितोषिक 31 हजार रुपयांचे तर तिसरे पारितोषिक 21 हजार रुपयांचे. तसेच प्रत्येक गटासाठी प्रत्येकी अकरा हजार रुपयांची दोन उत्तजेनार्थ पारितोषिके.
कार्यक्रम कुठे? आणि कधी?
सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील विजय तेंडुलकर नाट्यगृहात उद्या शनिवारी (दि. 20 सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता.
कार्यक्रमाचे स्वरूप काय?
नटरंग ॲकॅडमीचे जतीन पांडे आणि सहकलाकार यांचा गायनासह वैविध्यपूर्ण नृत्याविष्काराचा रंगारंग कार्यक्रम. ‘इतिहासकालिन गणेश उत्सव’ या विषयावर पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान तर पुण्याच्या गणेशोत्सवाविषयीच्या आठवणींचा उल्हास पवार यांनी घेतलेला धांडोळा. तसेच कार्यकर्त्यांचा कौतुक सोहळा.
महिला सन्मानावर भर देणाऱ्या मंडळांचा पुढील वर्षी गौरव
गणाधीश नवोन्मेष स्पर्धेतील दुसरा गट आहे तो महिला सन्मान... त्यात हुंडाबळीच्या, महिला अत्याचाराच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठीचा संदेश पुढील वर्षभर नागरिकांपर्यंत उत्तमरित्या पोचविणाऱ्या मंडळांना वर्षअखेरीस पारितोषिके देण्यात येणार आहेत.
‘महिला मागत आहेत - समता, सन्मान, सुरक्षा आणि न्याय’ हे या संदेशाचे मुख्य सूत्र राहील. मंडळांनी पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाच्या एक महिना आधी आपण केलेल्या कामांचा अहवाल लेखी स्वरुपात पुढारी भवन, मित्रमंडळ चौक, पुणे-09 येथे सादर करायचा असून, पाकिटावर स्पष्ट शब्दांत ‘पुढारी गणेशोत्सव महिला सन्मान स्पर्धेसाठी’ असा उल्लेख करावा. त्याचे परीक्षण केल्यानंतर त्या गटातील पारितोषिके जाहीर केली जातील, पुढील वर्षीच्या पारितोषिक वितरणात ती दिली जातील.