पुणे

Pimpri News : पोलिसांच्या कारवाईनंतरही गल्लोगल्ली गॅस रिफिलिंग

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी अवैधरित्या मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरला जातो. अतिशय धोकादायक पद्धतीने हे गॅस रिफिलिंग केले जाते. अशा प्रकारे रिफिलिंग करीत असताना थेरगाव येथे स्फोट होऊन दोघांना आपले प्राण गमवावे लागल्याची नोंद आहे. पोलिसांनी यापूर्वी अशा दुकानांवर करावायादेखील केल्या आहेत. मात्र, कारवाईनंतर आजही गल्लोगल्ली गॅस रिफिलिंगचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरात परराज्यातून आलेल्या कामगारांची संख्या जास्त आहे. बहुतांश कामगार बर्नर सिलिंडरचा वापर करतात. यामध्ये दोन ते पाच किलोपर्यंत गॅस भरला जातो. हा गॅस संपला की, कामगार गॅसच्या दुकानात जातात. त्या वेळी व्यावसायिक मोठ्या सिलिंडरमधून गॅस काढून छोट्या सिलिंडरमध्ये भरून देतात.

गरज भागत असल्याने कामगारही याबाबत कसलीही विचारणा करीत नाहीत. प्रत्यक्षात मात्र घरगुती किंवा व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमधून हा गॅस काढला जातो. त्यानंतर गॅस काढलेला अर्धवट कोणाच्यातरी माथी मारला जातो. यामध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. याशिवाय काहीजण गॅस एजन्सीतून बाहेर पडणार्‍या सिलिंडरमधूनही गॅस चोरून काढून घेतात.

चालू वर्षात 11 लाखांचे सिलिंडर जप्त

पोलिसांनी चालू वर्षात अवैध गॅस रिफिलिंगचे एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये एकूण 24 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 31 लाख 14 हजार 8 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये जप्त केलेल्या सिलिंडरची किंमत दहा लाख 96 हजार 8 रुपये इतकी आहे.

अशा प्रकारे करतात गॅस चोरी

मोठ्यामधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस काढण्यासाठी एका कनेक्टरचा वापर केला जातो. जो दोन्ही सिलिंडरला कनेक्ट होतो. त्यानंतर मोठा, छोट्या सिलिंडरवर उपडा ठेवला जातो. त्यानंतर काही वेळात गॅसचे प्रेशर मोजून किती गॅस भरला गेला आहे, याचा अंदाज लावला जातो. तसेच, मोठ्या टँकरमधून गॅस चोरी करण्यासाठी आरोपींनी मोठे कनेक्टर बनवून घेतल्याचे समोर आले आहे.

सामाजिक संघटना आक्रमक

ताथवडे येथील सिलिंडरच्या स्फोटानंतर शहरातील अनेक सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. यापूर्वी तक्रार करूनही पोलिस कारवाई करीत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेड तसेच छावा संघटना यांनी कारवाईच्या मागणीचे निवेदन देत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT