आळंदी : पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या खुनाचा बनाव करण्यासाठी दुसर्या व्यक्तीचे शीर धडावेगळे करत तसेच स्वतःचे कपडे घालून मृतदेह पुन्हा रोटर मशीनमध्ये फिरवून निर्घृण खून करणार्या आरोपीला अखेर गजाआड करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी ही माहिती दिली. सुभाष ऊर्फ केरबा छबन थोरवे (वय 65, रा. चर्होली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे, तर रवींद्र भीमाजी घेनंद (वय 48) असे मयत व्यक्तीचे नाव असून, निखिल रवींद्र घेनंद (वय 28, रा. धानोरे, ता. खेड) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शीर नसल्याने पोलिसांचा तपास सुरू होता. संशयित थोरवे हा शेलपिंपळगाव येथे रात्री जिवंत आढळला आणि पोलिसांना धक्काच बसला.
अंत्यविधी आणि दशक्रियादेखील केला
सुभाष रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता शेतामध्ये मृतदेह दिसला. मृतदेहाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. विनाशीर मृतदेह सुभाष थोरवे याचाच असावा, असे समजून तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर नातेवाइकांनी विधिवत अंत्यविधी केले आणि दशक्रिया विधीही पार पडला.