पुणे

पुणे : गदिमा, बाबूजींचा उल्लेख टाळणे खपवून घेणार नाही ; कुटुंबीयांचा इशारा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  हल्ली 'गीतरामायण' कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या संस्था आणि कलाकारांमार्फत लेखक म्हणून गदिमांचा आणि संगीतकार म्हणून बाबूजींचा साधा उल्लेखही केला जात नाही. गदिमा आणि बाबूजींचा नामोल्लेख टाळणे हे माडगूळकर कुटुंबीयांतर्फे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा गदिमा कुटुंबीयांकडून देण्यात आला आहे. 'गीतरामायण' हे महाकवी ग. दि. माडगूळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी अजरामर केले आहे. भारतात व परदेशात 'गीतरामायण'चे अनेक कार्यक्रम होत असतात. मात्र, हलगर्जीपणामुळे गदिमा-बाबूजी यांच्या नावांचा उल्लेख न करण्याचा वाईट पायंडा काही लोक पाडत आहेत.

कार्यक्रमाच्या जाहिरातीत, प्रत्यक्ष कार्यक्रमांच्या फलकावर लेखक म्हणून गदिमांचा उल्लेख केला जात नाही. 'गीतरामायण'चे कॉपीराइट हक्क अजूनही माडगूळकर आणि फडके कुटुंबीयांकडेच असून, ते 2062 पर्यंत अबाधित राहणार आहेत. गदिमांना, बाबूजींना त्यांचे श्रेय योग्यरीतीने न दिल्यास माडगूळकर कुटुंबीयांतर्फे त्या कार्यक्रमावर कॉपीराइट कायद्यांमार्फत आक्षेप घेतला जाईल. प्रत्येक जाहिरात फलकावर तसेच कार्यक्रमाच्या फलकावरही 'महाकवी ग. दि. माडगूळकर विरचित गीतरामायण' असा उल्लेख असायलाच हवा. तसेच, 'संगीत : सुधीर फडके' असा उल्लेख असणे आवश्यक आहे, अशी मागणी गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे.

कुणीही 'गीतरामायण'चे कार्यक्रम सादर करू शकतो. त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र, गदिमांच्या नावाचा उल्लेख जाहिरातीत आणि कार्यक्रमात असायलाच हवा. गदिमा व सुधीर फडके यांना त्याचे श्रेय मिळालेच पाहिजे.
                                                         – सुमित्र माडगूळकर, 'गदिमां'चे नातू

SCROLL FOR NEXT