FYJC admission status 2025
पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, पहिल्या प्रवेश फेरीअंतर्गत राज्यात 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये पुणे विभागांतर्गत 1 लाख 16 हजार 291 जागांसाठी प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 4 लाख 8 हजार 261 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आली. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलै या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशातील पहिल्या प्रवेश फेरीसाठी राज्यातील 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांनी अर्ज केले.
त्यात कला शाखेच्या 2 लाख 31 हजार 356 विद्यार्थ्यांनी, तर वाणिज्य शाखेच्या 2 लाख 24 हजार 931 विद्यार्थ्यांनी आणि विज्ञान शाखेच्या 6 लाख 9 हजार 718 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्या 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंती क्रमांकानुसार पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 435 महाविद्यालयांमध्ये 16 लाख 70 हजार 598 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 4 लाख 53 हजार 122 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 23 हजार 720 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 13 लाख 45 हजार 974 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
त्यापैकी 3 लाख 34 हजार 400 विद्यार्थ्यांनी कॅपव्दारे तसेच 73 हजार 861 विद्यार्थ्यांनी विविध कोटाअंतर्गत अशा एकूण 4 लाख 8 हजार 261 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी कॅप प्रवेशाच्या 13 लाख 36 हजार 198, कोटा प्रवेशाच्या 3 लाख 79 हजार 261 अशा एकूण 17 लाख 15 हजार 459 जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ प्रश्नावर तत्काळ तोडगा काढा...
अकरावीसाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाइव्हची सुविधा आहे. परंतु, सीबीएसईसह अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:हून बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण टाकले. आता प्रवेश जाहीर झाल्यानंतर मात्र महाविद्यालये त्यांचे प्रवेश नाकारत असल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे जर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ची सुविधा असेल, तर अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय कशासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यापुढील फेर्यांमध्ये संबंधित प्रश्न उद्भवू नये यासाठी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.