पुणे

मावळात झळकले ‘भावी मुख्यमंत्री’चे बॅनर; अजित पवारांच्या स्वागतासाठी फ्लेक्सबाजी

अमृता चौगुले

वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे रविवारी मावळ तालुक्यात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आले असता तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी दौर्‍यावर त्यांचे 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले होर्डिंग्ज लावून स्वागत केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

तालुक्यात विविध विकासकामांचे उद्घाटन

विरोधी पक्षनेते अजित पवार हे रविवारी मावळ तालुक्यातील कान्हे येथील जिल्हा परिषद शाळा, नवलाख उंबरे येथील एका खासगी कार्यालयाचे उद्घाटन तसेच बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने आले होते. त्यांच्या स्वागतासाठी तालुक्यात राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आली.

यामध्ये पुणे-मुंबई महामार्गावर जांभूळ फाटा येथे लावलेल्या होर्डिंग्जवर अजित पवार यांचा महाराष्ट्र राज्याचे 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख केला होता. या होर्डिंग्ज वर आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह पदाधिकारी दीपक हुलावळे, चंद्रकांत दाभाडे, संदीप आंद्रे यांचेही फोटो असून स्वागतोत्सुक म्हणून पुढारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा उल्लेख आहे.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं

मावळ तालुक्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशा आशयाची अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. रविवारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा मावळ तालुक्यात अनेक ठिकाणच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी दौरा आयोजित केला होता. या दौर्‍यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व सदिच्छा भेट आयोजित केली होती. या वेळी अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशा आशयाचे फ्लेक्स लावल्याचे दिसून आले.

चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावले जात असल्याने राज्यभरात चर्चा सुरू आहे. असे असताना आज मावळ तालुक्यातही असेच फ्लेक्स झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT