पुणे : चारित्र्याचा संशय व मुलबाळ होत नसल्याच्या कारणातून पत्नीचा हाताने आणि रस्सीने गळा आवळून खून केल्यानंतर पती स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात हजर झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियांका आकाश दोडके (वय २७, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तिचा पती आकाश विष्णू दोडके (वय ३५) याला अटक केली आहे. ही घटना त्यांच्या भेकराईनगर येथील राहत्या घरी २६ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. याबाबत प्रियांका यांचा भाऊ सागर रामदास अडागळे (वय ३५, रा. नानगाव, दौंड) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश दोडके हा वाहनचालक म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी प्रियांका गृहिणी होती. दोघे ही एकमेकांच्या नात्यातील आहेत. 18 फेब्रुवारी 2018 मध्ये प्रियांकाचा आकाशसोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून आकाश प्रियांकावर संशय घेत होता. तसेच मुलबाळ होत नसल्याच्या कारणातूनही तो सतत प्रियांकाला शिवीगाळ करून मारहाण करत होता. प्रियांकाने याबाबत आपल्या भावासह माहेरच्या लोकांना कल्पाना दिली होती. त्यामुळे मागील तीन वर्षापासून प्रियांका आकाश सोबत न राहता भावाकडे राहत होती. आठ दिवसांपूर्वीच आकाशने प्रियांकाला फोन करून नांदण्यासाठी ये म्हणून फोन केला होता. त्यामुळे ती त्याच्याकडे पुण्यात राहण्यास आली होती.
आकाशने २६ डिसेंबरला रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास प्रियांकाचा भेकराईनगर फुरसुंगी येथील राहत्या घरी हाताने आणि रस्सीने गळा आवळून खून केला. त्यानंतर आकाश स्वतःहडपसर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. ही घटना फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे हडपसर पोलिसांनी त्यांना ही माहिती दिली. आरोपी आकाश याला फुरसुंगी पोलिस त्याच्या राहत्या घरी घेऊन गेले. प्रियांकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रियांकाच्या भावाला फुरसुंगी पोलिसांनी ही माहिती दिली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.
25 डिसेंबर रोजी प्रियांका नानगाव दौंड येथे भावाच्या घरी आली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पुण्याला परत गेली. त्या दिवशी फिर्यादी सागरच्या पत्नीने प्रियांकाच्या मोबाईलवर फोन केला. मात्र, तिने तो उचलला नाही. त्यामुळे तिने प्रियांकाचा पती आकाशच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी त्याने प्रियांका घरातून निघून गेल्याचे सांगितले.