पुणे

फुरसुंगी-उरुळी देवाची टीपी स्कीम नगरपरिषदेकडे!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका गेल्या तीन वर्षांपासून काम करीत असलेल्या फुरसुंगी नगररचना योजना (टीपी स्कीम) आता फुरसुंगी-उरुळी देवाची या दोन गावांसाठी होणार्‍या नवीन नगरपरिषदेकडे जाणार आहेत. त्यामुळे टीपी स्कीमसंदर्भातील सर्व कागदपत्रे नगरपरिषदेला देण्यात येणार आहेत. राज्य सरकारने 2017 मध्ये महापालिकेच्या हद्दीत 11 गावे समाविष्ट केली.

या अकरा गावांपैकी फुरसुंगी येथे दोन आणि उरुळी देवाची या गावांमध्ये टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार फुरसुंगी येथील 261 हेक्टरवरील टीपी स्कीम राबविण्याचे महापालिकेकडून 10 मार्च 2022 मध्ये जाहीर करण्यात आले. एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार दोन वर्षांत या योजनेचे प्रारूप जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु, मध्यंतरी कोरोना व लॉकडाऊनमुळे ही योजना राबविण्यास राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपत असल्याने महापालिकेकडून या योजनेचे प्रारूप आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशाने प्रसिद्ध करण्यात आले.

योजनेचे नकाशे आणि अहवाल नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. मात्र, राज्य सरकारने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही महापालिकेतून वगळण्याचा व दोन गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद निर्माण करण्याचा अध्यादेश नुकताच जारी केला. त्यामुळे महापालिकेने नियोजन केलेली टीपी स्कीमही आता नगरपरिषद करणार आहे. आतापर्यंत टीपी स्कीमचे केलेले कागदोपत्री काम हे नगरपरिषदेला देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT