महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्यात सुमारे 3 हजार 845 हेक्टर सोयाबीन पिकाची पेरणी पूर्ण झाली असून, पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यातच या पिकावर कीड व बुरशी रोगाचा प्रादुर्भावदेखील काही प्रमाणात दिसून येत आहे. या पिकाला औषधफवारणी व खतांचा भांडवली खर्च परवडत नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
आंबेगाव तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील महाळुंगे पडवळ, चास, थोरांदळे, जाधववाडी, लौकी, गिरवली, एकलहरे, विठ्ठलवाडी, टाकेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील सोयाबीन पिकावर बुरशी व कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. (Latest Pune News)
त्यातच पावसाने दडी मारल्याने रोपे सुकू लागले आहेत. अशातच सोयाबीनचा बाजारभाव पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या वर्षी सततच्या पावसामुळे जमिनीत प्रचंड ओलावा आहे. त्यामुळे बुरशी रोगाचा प्रादुर्भाव सर्वच पिकांवर दिसून येत आहे. सोयाबीन पिकाच्या मुळ्या हुमणी खात आहेत. त्यामुळे सोयाबीनचे शेंडे सुकलेले दिसतात. परिणामी, संपूर्ण झाड वाया जाते. त्यातच पाऊस नसल्याने हलक्या जमिनीवर पेरणी करण्यात आलेले सोयाबीन पिवळे पडले आहे.
सोयाबीन पिकाला मागील काही वर्षांच्या तुलनेत अतिशय कमी 40 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळाला. शासनामार्फत खरेदी करण्यात येणारे सोयाबीन ठराविक जिल्ह्यातच खरेदी केले गेले. हजारो क्विंटल सोयाबीन आजही शेतकर्यांच्या घरात शिल्लक आहे. त्यातच नव्याने सोयाबीनची पेरणी करण्यात आली. यावर महागडी औषधांची फवारणी करणे परवडत नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
सोयाबीन पिकावर 13-0-45 या पाण्यात विरघळणार्या खतांची फवारणी करावी. पीक काही काळ पाण्यापासून तग धरू शकेल, पिकाची प्रतिकारक्षमता वाढेल. यासह प्रभावी कीटकनाशकांचा वापर करावा.- सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव
सोयाबीन पिकाची पाने व शेंडे खाणार्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी कोराजनसारखे प्रभावी कीटकनाशक वापरावे लागते. शासनाच्या कृषी विभागामार्फत औषधे शेतकर्यांना उपलब्ध करून द्यावीत.- रमेश खिलारी, माजी अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ