Toxic Liquor Tragedy Pudhari
पुणे

Toxic Liquor Tragedy: ईदपूर्वीच दोन घरांवर काळाचा घाला; विषारी दारूने हिरावले दोन जिवलग मित्र

फुगेवाडीत अकबर पठाण आणि बाबा शेख यांचा मृत्यू; मैत्री, संसार आणि कुटुंबांची स्वप्ने एका घोटात उद्ध्वस्त

पुढारी वृत्तसेवा

सांगवी: फुगेवाडीत आज दोन अशा घरांची राखरांगोळी झाली, जिथे सण साजरा होण्याऐवजी स्मशानशांतता पसरली होती. मंगळवारी रात्री एकाच ठिकाणी आनंदाने बसलेले पाच मित्र बुधवारी मरणाच्या दारात उभे ठाकले आणि दुर्दैवाने अकबर पठाण (52) व बाबा शेख (45) या दोन जिवलग मित्रांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. ही केवळ दोन माणसांची मृत्यूची बातमी नाही, तर दोन संसारांच्या पूर्णपणे उदध्वस्त होण्याची ही कारुण्यकथा आहे.

मैत्रीचा असा शेवट कुणी पाहिला नव्हता...

विजय राठोड, राजू राठोड, अकबर पठाण, बाबा शेख आणि राजू राजपूत हे पाच मित्र मंगळवारी एकाच वेळी एकत्र आले होते. मैत्रीच्या गप्पा रंगल्या होत्या; पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांनी घेतलेला तो एक घोट त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरेल. दारूच्या एका बाटलीत दडलेल्या विषाने एकापाठोपाठ एका अशा पाचही मित्रांच्या शरीरात कालवाकालव केली.

45 वर्षीय बाबा शेख सुतार काम करत होते. हातावरचे पोट, पण कुटुंबावर जीवापाड प्रेम. आई जमशेर बी (65), पत्नी शाईन शेख (35) 19 वर्षांची मुलगी मिसबा आणि 16 वर्षांचा मुलगा निजाम. आईने आणि पत्नीने अनेकवेळा विनवणी केली, नको रे दारू पिऊ, पण नियतीचे चक्र फिरले होते. बुधवारी जेव्हा त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला, हात-पाय आकडले, तेव्हा अख्या घराचा श्वास थांबला. वायसीएम रुग्णालयात त्यांच्या पोटातून दीड बाटली विषारी दारू काढली गेली.

आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर तडफडताना, त्यांच्या डोळ्यांत फक्त मुलांचे भवितव्य दिसत होते. दोन तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बाबा शेख यांनी कायमचे डोळे मिटले. आज त्यांचे घर पोरके झाले आहे. 52 वर्षांचे अकबर पठाण इलेक्ट्रिशियनचे काम करत होते. त्यांच्या मागे पत्नी सलमा आणि 10 वर्षांचा मुलगा आहे. ज्या वयात मुलाने बापाच्या खांद्यावर बसून दुनिया पाहायची, त्या वयात हा मुलगा आता वडिलांच्या फोटोकडे एकटक बघत बसला आहे. भाड्याच्या घरात राहणारा हा परिवार आता रस्त्यावर आला आहे.

नातेवाईकांचा आक्रोश

आज फुगेवाडीच्या गल्लीबोळातून दोन अंत्ययात्रा निघाल्या. समोर बाबा शेख यांची वृद्ध आई आणि पत्नीचा आक्रोश, तर शेजारी सलमा पठाण यांचा टाहो... हे चित्र बघून दगडही पाझरेल. एकीकडे ईदचा सण, तर दुसरीकडे या दोन कुटुंबांच्या घरातून येणारा हंबरडा. ज्या दारूने या दोन मित्रांचे आयुष्य हिरावून घेतले, ती दारू कुणी विकली? त्या विषारी साठ्याला जबाबदार कोण? हे प्रश्न आज उपस्थित होत आहेत. सणाचा आनंद एका क्षणात दुःखाच्या महापुरात कसा वाहून जातो, याचे हे विदारक वास्तव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT