Pimpri Chinchwad Toxic Liquor Death Pudhari
पुणे

Toxic Liquor Deaths: फुगेवाडीत विषारी दारूचा कहर! 13 जणांचा मृत्यू; अनेकांची मृत्यूशी झुंज

मिथेनॉल मिश्रित दारूचा संशय अधिक गडद; 10 आरोपी जेरबंद, फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: फुगेवाडीतील हातभट्टीच्या दारूचे ‌‘फुगे‌’ जीवघेणे ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. मागील दोन दिवसांत विषारी दारू प्राशनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण मृत्यूशी झुंज देत आहेत. एकामागून एक बळी जात असताना मृत्यूपूर्वी सर्वांमध्ये दिसून आलेली समान लक्षणे आणि तपासात समोर आलेले प्राथमिक धागेदोरे यामुळे विषारी दारूच या दुर्घटनेमागे असल्याचा संशय अधिक बळावला आहे. मृतांचा व्हिसेरा नमुन्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू करण्यात येणार असून, त्यातून या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

काही जणांची प्रकृती गंभीर

याबाबत सविस्तर वृत्त असे, की दापोडी येथील हातभट्टीच्या अड्ड्यावर मंगळवारी (दि. 26) रात्री आणि बुधवारी सकाळी काही नागरिकांनी दारूचे सेवन केले होते. ही दारू रासायनिक घटक मिसळून तयार करण्यात आली होती. सुरुवातीला दारू पिल्यानंतर केवळ डोळ्यांची आग होत असल्याने काही जणांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, बुधवारी रात्रीपासून आणि गुरुवारी अचानक अनेकांची प्रकृती खालावू लागली. चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, तोंडातून फेस येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत वेदना होणे अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली. काही जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर, काहींना उपचारासाठी धावपळीत रुग्णालयात हलवावे लागले. दरम्यान, या घटनेची पोलिस खात्याच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली असून, उच्चपदस्थ अधिकारी दापोडी पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत.

मृतांची नावे

वायसीएम रुग्णालयामध्ये गुरुवारी (दि. 28) राजेश शांताराम राजपूत (वय 50), अकबर अजिमखान पठाण (वय 48), आनंद पांडेराव देसाई (वय 53), आनंद काशिनाथ निकाळजे (वय 64), पांडुरंग सखाराम फुगे (वय 53), विजय प्रकाश राठोड (वय 31), बाबा शेख (वय 45) आणि राजेंद्र प्रकाश राठोड (वय 34) यांचा मृत्यू झाला. तर, शुक्रवारी अक्षय अशोक अवसरमल (वय 28), सचिन रामचंद्र नेटके (वय 36), भीमण्णा बसन्ना नागराल (वय 27) आणि सुरप्पा मनप्पा बंगारी (वय 55), कदीर अब्दुल शहा (वय 45) या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

अतिदक्षता विभागातील रुग्ण

वायसीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात श्रीमंत शिवपुत्र कोळी (वय 54), प्रकाश उमाजी राठोड (वय 65) आणि जितू मनोहर शेतादपूरी (वय 31) यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी कोळी आणि शेतादपूरी यांचे डायलिसिस करण्यात येत आहे. विषारी रसायनांचा परिणाम मूत्रपिंडांवर झाल्याची शक्यता डॉक्टरांकडून तपासली जात आहे. याशिवाय सुभाष मलप्पा डिगिकर (वय 66) यांच्यावर मेडिपॉइंट रुग्णालयात तर चंदन राममली कुमार (वय 26) यांच्यावर औंध जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपींनी 35 लिटर क्षमतेचे 10 ड्रम तयार केले

तपासात आरोपींकडून स्पिरिट आणि मिथेनॉल रसायन वापरून अवैध दारू तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी 35 लिटर क्षमतेचे तब्बल 10 ड्रम तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यापैकी एक ड्रम फुगेवाडी परिसरातील कर्नेलसिंह आणि गुरमंगतसिंह यांच्याकडे पुरविण्यात आल्याचा संशय आहे. उर्वरित दारूचा पुरवठा नेमका कुठे झाला, याचाही शोध सुरू आहे.

रुग्णांचा शोध घेताना पोलिसांची दमछाक

विषारी दारूचे सेवन किती जणांनी केले, त्यापैकी किती जणांना त्रास झाला, कोणत्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि आणखी किती जणांनी उपचार घेतले आहेत, याची माहिती गोळा करताना पोलिसांची मोठी दमछाक होत आहे. वायसीएम रुग्णालय आणि औंध जिल्हा रुग्णालयासह शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये गेल्या आठवडाभरात दाखल झालेल्या संशयित रुग्णांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. काही रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती समोर आली असली तरी त्यांच्या प्रकृतीबाबत पोलिसांकडे अद्याप संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आणखी काही रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे.

फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा

या घटनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वायसीएममध्ये दाखल झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये सारखीच लक्षणे आढळून आली. त्यामुळे डॉक्टरांनाही विषारी द्रव्य सेवनाचा संशय आहे. मृतांपैकी नऊ जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मात्र, दारूचे सेवन मंगळवारी रात्री झाले असल्याने शवविच्छेदनावेळी शरीरात थेट अल्कोहोलचे अंश स्पष्टपणे आढळून आले नाहीत. त्यामुळे मृतांच्या शरीरातील अवयवांचे नमुने (व्हिसेरा) वेगळे काढून जतन करण्यात आले आहेत. हे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्या अहवालातून कोणते रसायन शरीरात गेले होते, ते दारूमधून गेले की अन्य कोणत्या पदार्थातून, याचा उलगडा होणार आहे.

मिथेनॉलमुळे अवयव निकामी

मिथेनॉलसारख्या विषारी रसायनांचे मिश्रण झाल्यास सुरुवातीला किरकोळ लक्षणे दिसतात. त्यानंतर काही तासांनी किंवा एक-दोन दिवसांनी त्याचा गंभीर परिणाम डोळे, मेंदू, मूत्रपिंडे आणि श्वसनसंस्थेवर होतो. फुगेवाडीतील रुग्णांमध्ये दिसून आलेली लक्षणे अशाच प्रकाराशी साधर्म्य दर्शवित असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील सूत्रांची माहिती आहे.

आरोपींना बेड्या

याप्रकरणी दापोडी पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे. कर्नेलसिंह तखतसिंह विरका (वय 73), गुरमंगतसिंह कर्नेलसिंह विरका (वय 45, दोघे रा. संजयनगर, फुगेवाडी), योगेश राजेंद्र व्हानकडे उर्फ सिकंदर राठोड (वय 23, रा. केशवनगर, मुंढवा), राधेश्याम हरिराम प्रजापती (वय 35, रा. उरुळी कांचन), कल्पेश अगरवाल (वय 30, रा. खडकी) आणि अरिहंत संजीव धोत्रे (वय 25) यांना दापोडी पोलिसांनी अटक केली आहे. या सहाही आरोपींना न्यायालयाने 8 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच, आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी, दयानंद राजपूत आणि आर्यन संजय धोत्रे या चौघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. आरोपींविरोधात सदोष मनुष्यवध, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, अपायकारक पदार्थांद्वारे इजा करणे, इतरांचे जीव धोक्यात आणणारी कृती, अपायकारक पेयाची विक्री तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गावी घर बांधायचे स्वप्न अपुरेच राहिले

विषारी दारू पिल्यामुळे मृत्यू झालेल्या सौराप्पा बंगारी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पतीच्या निधनानंतर पत्नी लक्ष्मीबाई बंगारी यांनी हंबरडा फोडत, माणूसच गेला, आता आम्ही काय करायचे? घराचा आधारच निघून गेला. दारूची दुकाने कायमची बंद झाली पाहिजेत, अशी भावना व्यक्त केली. दापोडी परिसरात वॉचमन म्हणून काम करणारे सौराप्पा बंगारी बुधवारी दारू पिऊन घरी आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. नेहमीपेक्षा वेगळा वास येत असल्याचे आणि चेहरा लाल पडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सौराप्पा बंगारी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि तीन सुना असा परिवार आहे. ते कुटुंबातील प्रमुख आधार होते. गावी स्वतःचे घर बांधण्याचे त्यांचे स्वप्न होते, असे पत्नीने सांगितले. सरकारने या प्रकरणात कठोर कारवाई करून दारूविक्रीवर कायमस्वरूपी नियंत्रण आणावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT