नरेंद्र साठे
पुणे : जिल्ह्यात गावागावांत अनेक ठिकाणी शौचालयांचे सेफ्टी टँक ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. सेफ्टी टँक रिकामी करण्यासाठी जिल्हा परिषदेने सक्शन मशिन घेतल्या. मात्र, मैला वाहून कुठे टाकायचा? हा प्रश्न होता. त्यावर आता जिल्हा परिषदेकडून गावांमध्येच 23 ठिकाणी मैला गाळ प्रक्रिया प्रकल्प (एफएसटीपी) उभारण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेकडून सक्शन मशिन भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. केवळ मशिन खरेदी केल्याने पुढची प्रक्रिया करण्यास विलंब झाला आहे. या मशिन गावागावांत सेफ्टी टँकमधील मैला उचलून सध्या काही दिवस जवळच्या नगरपालिकेच्या मएफएसटीपीफमध्ये टाकणार आहेत. परंतु, सक्शन मशिनची क्षमता सात हजार लिटरची असल्याने लांबची वाहतूक करणे अयोग्य असल्याने प्रशासनाने गावामध्येच एफएसटीपी प्रकल्प सुरू करण्याचे ठरविले.
गावांकडून प्रस्ताव मागितले. आत्तापर्यंत 23 पैकी 17 गावांनी एफएसटीपी प्रकल्प उभा करण्यासाठी जागेच्या उपलब्धतेसह प्रस्ताव पाठविला आहे. तसा प्रस्ताव देखील जिल्हा परिषदेने राज्य शासनाला पाठविला आहे. शासनाकडून यासाठी अनुदानही उपलब्ध होणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.
एक प्रकल्प उभारणीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. या 23 प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. चार संस्थांची निवड केली असून, या संस्थांकडून आराखडा तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी झाल्यानंतर शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी त्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमधील प्रतिव्यक्ती 230 रुपये शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान, अनेक गावांमध्ये सेफ्टी टँक ओव्हरफ्लो झाल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी नागरिकांकडून अनेक दिवसांपासून याबाबत मागणी करण्यात येत आहे. सक्शन मशिन आणि मैला गाळ प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शौचालयांना सेफ्टी टँक असलेल्या गावांतील मैला प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.