पुणे : आंबिया बहारातील फळपिकांसाठी विमा योजना 2025-26 मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, काजू, केळी, द्राक्ष, पपई आणि स्ट्रॉबेरी या नऊ फळपिकांचा समावेश आहे. त्यामध्ये आंबिया बहारमधील मोसंबी, केळी ,पपई पिकांसाठी फळ पीकविमा योजनेत सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2025 असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक (प्रक्रिया व नियोजन) विनयकुमार आवटे यांनी दिली. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.(Latest Pune News)
अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे वारे, गारपीट अशा विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना लागू केली आहे. हवामान धोक्याचा ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकांसाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यांस नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. स्ट्रॉबेरी, द्राक्षपिकांच्या विमा सहभागाची मुदत संपलेली आहे. संत्रा, काजू, आंबा-कोकण येथील शेतकरी योजनेत 30 नोव्हेंबर, आंबा-कोकण सोडून इतर विभागांतील शेतकरी हे 31 डिसेंबर, तर डाळिंब शेतकरी 14 जानेवारी 2026 पर्यंत आहे.
साधारणतः ज्या महसुली मंडळात त्या फळपिकाखाली 20 हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे, अशा महसूल मंडळांना त्या फळपिकासाठी अधिसूचित करण्यात येते. तेथे ही योजना राबविण्यात येत असून, केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमासंरक्षण लागू राहणार आहे. त्यामध्ये आंबा, काजू फळपिकांचे उत्पादनक्षम वय 5 वर्षे असून, संत्रा, मोसंबीची 3 वर्षे, डाळिंब व द्राक्षांचे 2 वर्षे राहील. (पूर्वार्ध)