पुणे

कामशेतमध्ये सुट्या पैशांमुळे व्यापारी-ग्राहकांमध्ये कटकट

अमृता चौगुले

कामशेत : कामशेत बाजारपेठेत सुट्या पैशांच्या कमतरतेमुळे व्यापारी व ग्राहकांना दररोज अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सुटे पैसे नसल्यामुळे ग्राहकाला घेतलेल्या वस्तू परत ठेवावे लागतात किंवा व्यापारी सुटे पैसे आणा व माल घेऊन जा, असे सांगत असल्यामुळे अनेक वेळा वाद होत आहेत. व्यवसायावर परिणाम कामशेत बाजारपेठेत सध्या एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे सुट्या पैशांचा. या सुट्या पैशाच्या कमतरतेमुळे ग्राहक व व्यापारी यांच्यामध्ये प्रसंगी वाद होत असल्याचे दिसत आहे. सुट्या पैशांमध्ये प्रामुख्याने एक, दोन, पाच व दहा रुपयांची कमतरता जाणवते.

दहाचे नाणे घेण्यास टाळाटाळ
शक्यतो किराणा मालाचे दुकान, दूध डेअरी, बेकरी, भाजीवाले, पानटपरी, चहाचे दुकान, इस्त्रीचे दुकान, वडापावची गाडी इत्यादी दुकानात सुट्या पैशांची चणचण भासत आहे. दहा रुपयांच्या नोटांचा कागद पातळ असतो तो जास्त टिकाऊ नाही, त्यामुळे दहा रुपयाच्या फाटक्या नोटा जास्त आढळतात. त्यामुळे त्या नोटाही कोणी घेत नसल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. कामशेत बाजारपेठेत काही दुकानदार आणि रिक्षावाले दहाचे नाणे घेत नाहीत. त्यामुळे सुट्या पैशाची टंचाई अधिकच जाणवत आहे.

प्रश्न कधी सुटणार?
ऑनलाईन व्यवहारामुळे हा प्रश्न शहरामध्ये सहज सुटतो; पण ग्रामीण भागामध्ये लोकांना पैशाशिवाय पर्याय नसतो. आठवडे बाजारात भाजीवाल्यांना सुट्या पैशांसाठी एकमेकांवर अवलंबून रहावे लागते. किंवा गिर्‍हाईक सोडावे लागते. काही दुकानदार सुटे पैसे दोन तीन टक्के अधिक देऊन घेतात. त्यामुळे सुट्या पैशांचा काळाबाजार होतो की काय, अशी शंका निर्माण होत आहे. तरी ही समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी नागरिक करत आहेत.

सुट्या पैशांच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्राहक सुटे पैसे नसल्यामुळे दुकानातील वस्तू विकत घेत नाहीत. तर, कधी दुकानदार वस्तू न देता ग्राहकांना परत पाठवातात. याचा व्यवसायावर परिणाम होत आहे.

                                                              – उदय घोलप, दुकानदार

SCROLL FOR NEXT