पुणे : राज्यात यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सात दिवस अगोदर शाळांच्या मुख्याध्यापकांकडे पाठ्यपुस्तके पोहच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परीषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी परिपत्रकाव्दारे दिलेल्या माहितीनुसार, पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तका अभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना सुरु केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहेत.
मोफत पाठ्यपुस्तके योजना सन 2025-26 करिता विभागीय पाठ्यपुस्तके भांडार ते तालुकास्तर या टप्प्यातील पाठ्यपुस्तकांची वाहतूक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या वाहतूकदाराकडून करण्यात येणार आहे. तसेच तालुका ते शाळास्तरापर्यंतची पाठ्यपुस्तके वाहतूक संबंधित जिल्हा, तालुका स्तरावरून करण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तके वितरणाची तारीख संबंधित क्षेत्रातील पंचायत समितीतील सर्व संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांना कळविण्यात येईल, शाळा उघडण्यापूर्वी सर्व साधारणपणे सात दिवस आधी ही पाठ्यपुस्तके संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात देण्यात येतील. गावातील पदाधिकारी, अधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके समारंभपूर्वक ज्या दिवशी शाळा उघडेल त्याच दिवशी देण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.