बारामती; पुढारी वृत्तसेवा : जमीन व्यवहारासाठी 7 लाख 42 हजार रुपयांची रक्कम घेत त्यापैकी 4 लाख 64 हजार रुपये पतसंस्थेला भरून उरलेल्या 2 लाख 78 हजार रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करीत फसवणूक केल्याप्रकरणी विश्वास सुदाम चौधर (रा. वंजारवाडी, ता. बारामती) यांच्याविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन प्रल्हाद घोडे-गावडे (रा. कोर्हाळे बुद्रुक, ता. बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीला जमीन घ्यायची होती.
त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना विश्वास चौधर यांचे कटफळ गावच्या हद्दीतील जमीन गट नं. 59 मधील 13 गुंठे क्षेत्र पतसंस्थेचे कर्ज झाल्याने विकायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार प्रत्यक्ष भेट घेत हा व्यवहार 7 लाख 15 हजार रुपयांना निश्चित झाला. या क्षेत्रावर समता नागरी पतसंस्थेचे कर्ज होते. पतसंस्थेकडून 'ना हरकत' दाखला मिळाल्याशिवाय खरेदीखत शक्य नव्हते. त्यामुळे विसारपावती करण्यात आली. पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठी फिर्यादीने त्याना दोनदा आरटीजीएसद्वारे 7 लाख 42 हजार रुपयांची रक्कम दिली.
त्यानंतर ते पतसंस्थेचा दाखला कधी मिळणार, अशी विचारणा करू लागले असता चौधर यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली.
फिर्यादीने पतसंस्थेत जात माहिती घेतली असता चौधर यांनी पूर्ण कर्ज भरले नसल्याचे सांगितले. फिर्यादीने दिलेल्या 7 लाख 42 हजार रुपयांपैकी 4 लाख 64 हजार रुपये पतसंस्थेत भरत उरलेल्या 2 लाख 78 हजार रुपयांची रक्कम त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.