पुणे

बारामती : परस्पर कुलमुखत्यारपत्र करून देत फसवणूक

अमृता चौगुले

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती येथील कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेचे विश्वस्त असल्याचे भासवून पैसे घेऊन संस्थेच्या मोक्याच्या जागांच्या विकसनासाठी कुलमुखत्यारपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितीन पद्माकर पारकर (रा. शाहू हायस्कूलमागे, ख्रिश्चन कॉलनी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. शिरीष हरिभाऊ वाघमोडे (रा. बोरी, ता. इंदापूर), जयप्रकाश रत्नाकर गायकवाड (रा. बारामती), हरिश आबा सातपुते व स्वीटन जान साठे (रा. मुंबई) आणि वैभव वसंत पारधे (रा. ख्रिश्चन कॉलनी, बारामती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती येथील कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेचे विश्वस्त नसताना वाघमोडे, गायकवाड, सातपुते व साठे यांनी ते संस्थेचे विश्वस्त असल्याचे भासवत संस्थेची जागा विकसनासाठी वैभव पारधे यांना कुलमुखत्यार नोटरीद्वारे दिली.
या जागांमध्ये श्रीगोंदा (जि. नगर) येथील गट क्रमांक 1749 मधील 15 एकर क्षेत्र, बारामती येथील सिटी सर्व्हे नं. 923 वॉर्ड नं. 3 मधील 657.6 चौ. मी. जागा), भिगवण (ता. इंदापूर) येथील गट नं. 159, 160 मधील 7 एकर क्षेत्र, बारामती येथील गट नं. 267 चर्च इमारतीशेजारी जागा, शिर्सूफळ (ता. बारामती) येथील गट नं. 22 क्षेत्र 13.50 आर जागा, छेडानगर चेंबूर येथील गट नं. 100 व 101 यामधील क्षेत्र 993.23 चौ. मी. जागा तसेच चेंबूर महानगरपालिका हद्दीतील प्लॅट नं. 2 ए क्षेत्र 520 चौ. फूट व प्लॅट नं. 28 तिसरा मजला क्षेत्र 940 चौ. फूट टेरेससह, अशी सर्व मालमत्ता लिहून देण्यात आली. वैभव पारधे व सतीश दिगंबर महाले (रा. धुळे) यांच्यामध्ये यासंबंधी नोटरी झाल्याचे फिर्यादीला भाचा नेल्सन थोरात यांच्याकडून कळले. या घटनेत 3 लाख 40 हजारांची रक्कम घेत सतीश महाले याच्याशी समझोता करारनामा करण्यात आला होता. हा प्रकार फिर्यादीने संस्थेचे अध्यक्ष व इतर विश्वस्तांना सांगितला. त्यानंतर याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT