पुणे

पुणे: चार खंडणीखोरांना मोक्कात सहा वर्षे सक्तमजुरी, चायनिजमध्ये विष कालविण्याची देत होते धमकी

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: चायनिज गाडा चालकाला ईदची तीन हजार वर्गणी तसेच महिन्याला दोन हजार हप्ता अशी पाच हजारांची खंडणी मागत चाकुचा धाक दाखवून चायनिजमध्ये विष कालविण्याची धमकी देणार्‍या चार खंडणीखोरांच्या टोळीला विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी खंडणी तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) सहा वर्ष सक्तमजुरी तसेच प्रत्येकी 15 लाख 10 हजारांचा दंड ठोठावला आहे.

अब्दुल गनी खान, अक्षय राजेश नाईक, अक्रम नासीर पठाण आणि अक्षय अंकुश माने अशी शिक्षा झालेल्या चार आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका चायनियज हातगाडा चालकाने चौघां विरोधात फिर्याद दिली होती. खटल्यात विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी काम पाहिले.

जानेवारी 2017 पासून आरोपी फिर्यादी यांच्या हातगाडीवर येऊन चायनिज खावून विना पैसे देता जात होते. खाण्या पिण्यास न दिल्यास ते दमदाटी करत होते. 2 जून 2017 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते फिर्यादी यांच्या चायनिज हातगाडीवर आले. त्यांनी ईद निमित्त तीन हजारांची वर्गणी तर महिन्याला दोन हजार अशी पाच हजारांच्या खंडणीची मागणी केली. यावेळी त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत चायनिजमध्ये विष कालविण्याची व हातगाडीवरील सामान फेकुन दिले होते. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी आरोपींना जास्ती जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने चौघांनाही मोक्का, खंडणी उकळणे, संगणमत करणे व धमकावल्याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते यांनी केला.

SCROLL FOR NEXT