नसरापूर; पुढारी वृत्तसेवा : चहा करण्यासाठी चालू केलेला गॅस बराच वेळ तसाच राहिल्याने वरवे खुर्द (ता. भोर) येथे झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात दोन लहान मुलांसह चौघे भाजले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जालिंदर नारायण जाधव, रिध्दी संदीप शितोळे (वय 6), यश मोहन ताकवले (वय 11), संदीप बाळासो कदम (वय 34, सर्व रा. वरवे) अशी या घटनेत भाजलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी (दि. 25) पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संदीप बाळासाहेब थोपटे यांनी राजगड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालिंदर जाधव यांनी चहा करण्यासाठी गॅससिलिंडर सुरू केला. परंतु, त्यांना लायटर लवकर न सापडल्याने गॅस घरात पसरला. त्यामुळे गॅसचा स्फोट झाला. यात जालिंदर जाधव यांच्यासह चौघे भाजले. जालिंदर जाधव 80 टक्के, तर रिद्धी ही 30 टक्के भाजली आहे. त्यांना उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोंढणपूर फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिंदेवाडी पोलिसांची टाळाटाळ
शिंदेवाडी चौकीच्या हद्दीत अनेक अवैध धंदे सुरू आहेत. आर्थिक गणितातून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. तसेच गंभीर घटनांबाबत माहिती देण्यास शिंदेवाडीचे कारभारी नेहमीच टाळाटाळ करतात. या घटनेतही त्याचा अनुभव आला.