Pudhari File Photo
पुणे

टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार कर्मचार्‍यांचा होरपळून मृत्यू

हिंजवडी येथील घटना; सहाजण भाजल्याने गंभीर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : हिंजवडीतील एका कंपनीच्या कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या टेम्पो ट्रॅव्हलरने अचानक पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात चार कर्मचार्‍यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला; तर सहाजण गंभीररीत्या भाजले आहेत. चार कर्मचार्‍यांनी गाडीतून उड्या घेत आपला जीव वाचवला. बुधवारी (दि. 19) सकाळी हिंजवडी येथील विप्रो सर्कल फेज एकच्या परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली.

शंकर कोंडिबा शिंदे (वय 63, रा. सिद्धिविनायक आंगण सोसायटी, नर्‍हे), गुरुदास खंडू लोखरे (45, रा. हनुमाननगर, कोथरूड), सुभाष सुरेश भोसले (44, रा. त्रिलोक सोसायटी, वारजे) आणि राजन सिद्धार्थ चव्हाण (42, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) अशी मृत कर्मचार्‍यांची नावे आहेत; तर जनार्दन हंबर्डीकर, विश्वास खानविलकर, चंद्रकांत मलजी, प्रवीण निकम, संदीप शिंदे, विश्वास जोरी हे या घटनेत भाजले असून, त्यांना उपचारांसाठी हिंजवडीतील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे. विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप राऊत हे कर्मचारी सुरक्षितपणे ट्रॅव्हलरच्या बाहेर पडले.

हिंजवडी येथील फेज दोनमध्ये व्योम ग्राफिक ही कंपनी आहे. बुधवारी सकाळी एका टॅम्पो ट्रॅव्हलरमधून कंपनीच्या चालकासह एकूण चौदा कर्मचारी कंपनीत कामावर निघाले होते. हिंजवडी आयटी पार्कमधील फेज वनच्या पुढे आल्यानंतर चालकाच्या पायाखालील भागातून अचानक धूर येऊ लागला. काही कळण्याच्या आताच गाडीने पेट घेतला. त्यावेळी बसचालक जनार्दन हंबर्डीकर यांनी घाबरून तातडीने गाडीच्या खाली उडी मारली. तसेच, त्यांच्या बरोबर इतर काही कर्मचार्‍यांनीही बाहेर धाव घेतली. मात्र, शंकर शिंदे, गुरुदास लोखरे, सुभाष भोसले आणि राजू चव्हाण यांना गाडीच्या बाहेर पडता आले नाही. आग आणि धुराने त्यांना पूर्णपणे वेढले. बाहेर पडता न आल्याने त्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, वाहनातील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT