पुणे

पुणे : गोळी झाडून खून करणारी चौकडी अटकेत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जेवणाच्या निमित्ताने तरुणाला जेवणासाठी म्हणून घराबाहेर बोलावले. हडपसर येथील सातववाडी परिसरात नेऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह बोपदेव घाटात फेकून देणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी संशयित आरोपी रोहन राजेंद्र गायकवाड (23), योगेश सुभाष भिलारे (24), अक्षय संदीप गंगावणे (21) आणि चेतन परमेश्वर कुदळे (24, सर्व रा. सातववाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. गणेश नाना मुळे (21, रा. संकेतविहार, फुरसुंगी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील नाना तात्याराम मुळे (45, रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दि. 10 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्याचे मित्र गणेशला जेवणासाठी बाहेर घेऊन गेले होते. सातववाडी परिसरात जेवण केल्यानंतर वादातून संशयितांनी गणेश याच्यावर गोळी झाडून खून केला. चौघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह बोपदेव घाटात फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. चौघांनाही युनिट 5 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक चैताली गपाट, अंमलदार प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, रमेश साबळे यांच्या पथकाने अटक केली. बुधवारी दुपारी त्यांना लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.

पिस्तूलही जप्त
युनिट 5 च्या कर्मचार्‍यांना आरोपी हे नारायणपूर रोडवरील आचार्य गार्डन येथे थांंबल्याची माहिती मिळाली. त्यांना इको गाडीसह ताब्यात घेण्यात आले. गणेश मुळे याचा खून केल्यानंतर त्याची बाईक घेऊन ते शिंदवणे घाटात गेले. तेथे ती गाडी सोडून, नंतर बोपदेव घाटातील मंदिराजवळ गणेशचा मृतदेह फेकून दिला. त्यानंतर देहूगावात गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल टाकून दिली, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

SCROLL FOR NEXT