पुणे

Pune : प्रभू श्रीराम शिल्पाची पायाभरणी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हांडेवाडी येथे उभारण्यात येणार्‍या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचा पायाभरणी सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी हे पूर्णाकृती शिल्प उभारण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. श्रीराम चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना मुख्य प्रतोद व महाडचे आमदार भरत गोगावले आणि शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री स्व. गंगूबाई संभाजीराव शिंदे यांच्या नावाने वाचनालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला.

आमदार गोगावले म्हणाले, देशात श्रीरामाच्या मंदिराला विरोध असताना तो विरोध मोदींनी मोडून काढला. आगामी काळात हडपसरमध्ये 30 ते 35 फूट उंच विठ्ठल मंदिराची स्थापना करून, संतसृष्टी तयार केली जाईल. तसेच लवकरच महंमदवाडी गावाचे महादेववाडी होणार त्यांनी असल्याचे सांगितले. तर आढळराव पाटील यांनी वढू तुळापूरला होणार्‍या छत्रपती संभाजी महाराज स्मारक व गावच्या विकासकामांसाठी 400 कोटी निधी दिल्याचे सांगितले. तसेच प्रमोद भानगिरे हे 200 कोटींचा निधी पहिल्यांदाच प्रभागात आणलेले एकमेव नगरसेवक असल्याचे सांगितले. याचसोबत त्यांनी येणार्‍या निवडणुकीत महायुतीच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले.

या समारंभास शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, युवासेना सचिव किरण साळी, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, तुषार हंबीर, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे, गोरक्षक शरद मोहळ, आध्यात्मिक आघाडीचे ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख पूजा रावेतकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT