भोर : पुढारी वृत्तसेवा : किल्ले रोहिडेश्वर आणि शिंद या ठिकाणी असलेले प्रवेशद्वार जीर्ण झाले आहेत. हे प्रवेशद्वार केव्हाही
कोसळून दुर्घटना घडू शकते. पर्यटक आणि प्रवाशांच्या जीवितास धोका असल्याने हे प्रवेशद्वार पाडून त्या जागी नव्याने प्रवेशद्वार उभारावेत, अशी मागणी ग्रामस्थांसह गडप्रेमींकडून होत आहे. सन 1997-98 मध्ये पंचायत समितीचे तत्कालीन सभापती बाळासाहेब थोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून हवेली तालुक्यातील खानापूर येथून किल्ले रोहिडेश्वरकडे जाताना आणि भोलावडे येथे बाजी प्रभू देशपांडे यांच्या शिंद गावाकडे जाताना प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. या प्रवेशद्वारांना जवळपास 26 वर्षे झाली आहेत.
खानापूर येथील प्रवेशद्वारामधून किल्ले रोहिडेश्वरकडे असंख्य पर्यटक तसेच हातनोशी, बाजारवाडी, धावडी, पळसोशी, पाले या गावांतील विद्यार्थी, नागरिकांची ये-जा असते. प्रवेशद्वाराजवळच बसथांबा असल्यामुळे या प्रवेशद्वाराखाली प्रवासी वाहनांची वाट पाहत असतात. भोलावडे येथील प्रवेशद्वारातून शिंद, किवत, गवडी, ब—ाह्मणघर, महुडे या गावांकडे पर्यटकांसह स्थानिकांची वर्दळ असते. मात्र, ही दोन्ही प्रवेशद्वारे जीर्ण झाली आहेत. ती कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. त्यामुळे या दोन्ही प्रवेशाद्वारांतून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. तातडीने ही दोन्ही प्रवेशद्वारे पाडून त्या जागी नव्याने प्रवेशद्वारे उभारावीत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
ऐतिहासिक स्थळांकडे जाणारी प्रवेशद्वारे ही पर्यटकांसाठी दिशादर्शक आहेत. तसेच, त्या-त्या गावांची विशेष वास्तू आहेत. मात्र आता ही प्रवेशद्वारे जीर्ण झाली असून, जीवितहानी होऊ शकते. संबंधित प्रशासनाने याकडे ताबडतोब लक्ष देऊन ती पाडून नव्याने बांधून द्यावीत.
– संतोष रवळेकर पाटील, खानापूर ग्रामस्थ