उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रे निमित्त खेड तालुक्यात शनिवारी (दि १७)आयोजित केलेल्या युवक व महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्थान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूरची उमेदवारी देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या आढळराव यांचा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश झाला. त्यांना निवडणुकीत अपयश आले.
प्रत्यक्ष निवडणुकीत आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या आमदार, कार्यकर्त्यांची मदत मिळाली नाही असे आरोप झाले.तर निवडणुकी नंतर राष्ट्रवादीत विचारणा केली जात नाही असा आरोप खुद्द आढळराव पाटील यांनी देखील केला होता. आजच्या जाहीर कार्यक्रमात त्यांना उघडपणे डावलण्यात आल्याने व कार्यक्रमाच्या तालुका भर झळकलेल्या फ्लेक्स मध्ये पण आढळराव पाटील यांना कुठेही स्थान देण्यात आले नाही.यामुळे आढळराव पाटील आणि त्यांच्या समर्थकांना ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली असल्याचे मानले जात आहे.
आपणांस निमंत्रण नसल्याने सहभागी झालो नाही. त्याबाबत आपली तक्रार नाही.शिवाजीराव आढळराव-पाटील, माजी खासदार, अध्यक्ष, पुणे'म्हाडा'