पुणे

वडगाव मावळ : पंढरीचा वारकरी.. विधानसभेचा मानकरी.. हरपला ! दिगंबर भेगडे यांच्या निधनाने मावळात शोककळा

अमृता चौगुले

वडगाव मावळ : पंढरीचा वारकरी.. विधानसभेचा मानकरी..! अशी ओळख असलेले मावळ तालुक्यातील एक अजात शत्रू व्यक्तिमत्त्व माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे काल दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. दरम्यान, सर्वसामान्य नेता म्हणून परिचित असलेल्या दिगंबर भेगडे यांच्या निधनाने मावळ तालुका पोरका झाला असून, मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सलग 25 वर्षाच्या सत्तेच्या काळात माजी आमदार भेगडे यांनी सलग दोन वेळा म्हणजे 25 पैकी 10 वर्षे आमदार म्हणून तालुक्याची सेवा केली. सन 1999 च्या निवडणुकीत तिरंगी लढतीत ते विजयी झाले होते, त्यानंतर पुन्हा सन 2004 च्या निवडणुकीत ते दुरंगी लढतीत विजयी झाले होते. त्यापूर्वी त्यांनी मावळ पंचायत समितीचे उपसभापती म्हणूनही काम केले होते.

आमदार म्हणून कार्यरत असताना अतिशय शांत, संयमी स्वभावामुळे जनमानसात त्यांच्याविषयी वेगळीच आपुलकी निर्माण झाली होती. त्यांच्या या स्वभावामुळेच विरोधी पक्षाचे आमदार असताना त्यांनी मावळच्या विकासासाठी भरघोस निधी आणला होता. या स्वभावामुळेच मावळ तालुक्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. विशेष म्हणजे आमदार म्हणून कार्यरत असताना विरोधी असूनही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते.

जनसंघ ते भारतीय जनता पार्टी अशा पक्षाच्या संपूर्ण प्रवासात भेगडे यांनी पक्षाचे निष्ठावंत म्हणून अविरत पणे काम केले, या कामाची पावती म्हणूनच इंदोरी ग्रामपंचायतचे उपसरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाचे संचालक ते पक्षाचे तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले होते. तसेच पक्ष निष्ठेच्या जोरावरच उपसभापती, दोन वेळा आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला होता. गेली 10 ते 12 वर्षे पदावर नसले तरी ते राजकीय, सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे हे त्यांचे पुतणे होत. त्यांच्यावर सायंकाळी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात कुंडमळा, इंदोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT