पुणे

सेवा रस्त्याचा महापालिकेला विसर; नगर रोडवरील चित्र

Laxman Dhenge
वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने काही दिवसांपूर्वी येरवडा ते विमाननगर यादरम्यानचा बीआरटी मार्ग काढला आहे. जिथे हा मार्ग काढला, तिथे सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. सेवा रस्ता नसल्याने वाहनचालकांना पन्नास मीटर जाण्यासाठी चार किलोमीटरचा वळसा घालून यावे लागते तसेच अनेक वाहनचालक विरुद्ध बाजूने वाहने चालवत असल्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे.
नगर रोडवर बीआरटी मार्ग करताना रस्त्याच्या बाजूला सेवा रस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र, याचा महापालिकेला विसर पडला आहे. यामुळे सध्याच्या नियोजित सेवा रस्त्यांच्या जागेवर पथारी व्यावसायिकांसह इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. बीआरटी मार्ग करताना दाट लोकसंख्या असणार्‍या भागात नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग ठेवला नाही. यामुळे वाहनचालकांना पन्नास मीटर जाण्यासाठी चार किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे.
हे टाळण्यासाठी अनेक वाहनचालक विरुद्ध बाजूने वाहने नेतात.   नगर रोडवरील मातृछाया सोसायटी ही सिग्नलपासून दहा मीटर अंतरावर आहे. पण, तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने वाहनचालक विरुद्ध बाजूने येतात. उत्तम टॉवर भागातील अनेक सोसायट्यांना शंभर मीटर रस्ता ओलांडण्यासाठी चार किलोमीटरचे अंतर पार करावे लागत आहे. रामवाडी गावातील नागरिकांना वडगाव शेरीला जाण्यासाठी पालिकेने सेवा रस्ता केला नाही. विमाननगरवरून वेकफिल्डवस्ती या भागात जाण्यासाठी सेवा रस्ता नाही.  नगर रोडवर सेवा रस्ता करण्याबाबत नागरिकांनी महापालिका आणि वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार केला होता.
दोन्ही प्रशासनांच्या अधिकार्‍यांनी या पार्श्वभूमीवर रस्त्याची पाहणी केली होती. त्या वेळी सेवा रस्त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले होते. परंतु, त्यांनतर सेवा रस्ता झाला नाही.  महापालिकेने येरवडा ते विमाननगर यादरम्यानचा बीआरटी मार्ग काढल्याने रस्त्याची रुंदी वाढली आहे.  यामुळे शास्त्रीनगर आणि रामवाडी भागात सेवा रस्ता करण्याची मागणी शिवकर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव गलांडे आणि श्री तुकाईमाता सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद देवकर यांनी महापालिकेकडे केली आहे.

या ठिकाणी सेवा रस्त्याची गरज

  • रामवाडी ते छत्रपती संभाजी महाराज चौक
  • रामवाडी वेकफिल्डवस्ती ते छत्रपती संभाजी महाराज चौक
  • उत्तम टॉवर ते शास्त्रीनगर चौक
  • शास्त्रीनगर मातृछाया सोसायटी ते दास शोरूम
नागरिकांकडून सेवा रस्त्याची मागणी होत असल्यास याबाबत संबंधित विभाग आणि वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर त्याबाबत योग्य तो निर्णय घेता येईल.
उपेंद्र वैद्य, अधिकारी,  पथ विभाग, महापालिका

हेही वाचा

SCROLL FOR NEXT