पुणे

पुणे जिल्हा कार्यकारिणीत भाजपला निष्ठावंतांचा विसर

अमृता चौगुले

उरुळी कांचन : राज्यातील सत्तेच्या प्रयोगात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या संगतीचा परिणाम जिल्ह्यात भाजपच्या विस्तारावर झाला काय असा प्रश्न आता भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते विचारू लागले आहेत. जिल्ह्यात 2014 च्या सत्तेपूर्वी बोटावर मोजायला असलेल्या भाजपने जिल्हा कार्यकारिणी जाहीर करताना विधानसभेला तीव्र इच्छुक असणार्‍या पदाधिकार्‍यांच्या बगलबच्च्यांना संधी देताना निष्ठावान, सामान्य कार्यकर्त्यांना डावलेले आहे. राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपही आता आर्थिक ताकदीवर कार्यकर्त्यांची निवड करताना परीक्षण करतो काय, असा प्रश्नही भाजपच्या गोटातून विचारला जाऊ लागला आहे. जिल्ह्यात भाजपने उत्तर व दक्षिण अशी विभागणी करून जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत.

संबंधित बातमी  :

या नियुक्तीनंतर उत्तर व पश्चिम अशी जंबो कार्यकारिणी पक्षाने जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत विधानसभेनुसार इच्छुकांच्या पसंतीला झुकते माप देऊन नियुक्त्या झाल्या आहेत. या नियुक्त्या करताना फक्त विधानसभा निवडणुकीचाच विचार केला असल्याचे चित्र आहे. या नियुक्त्यांत यापूर्वी पक्षात कार्यरत नसलेल्या, पण विधानसभेला इच्छुकांच्या गोटात असलेल्या पदाधिकार्‍यांना संधी देण्यात आली आहे, तर बूथ लेवलवर काम करणार्‍या व पक्षासाठी राबणार्‍या कार्यकर्त्यांचा मात्र विचार झाला नसल्याच्या कार्यकर्त्यांच्या व्यथा आहेत. काही पदाधिकारी तालुका सोडून वेगळ्या नेतृत्वासाठी अंधारात काम करतात, त्यांना मात्र पक्षाने मोठी जबाबदारी सोपवल्याची कार्यकर्ते उघड चर्चा करताना दिसत आहेत.

राज्यात भाजपला 2014 च्या मोदी लाटेने सत्तेच्या केंद्रस्थानी बसविले असले तरी, भाजपला जिल्ह्यात मर्यादित यश मिळाले आहे. जिल्ह्यात एकाच दौंड विधानसभेत भाजपचा आमदार आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांत पक्षाला मोठे अपयश आले आहे. सहकार क्षेत्रातही भाजपला मर्यादित यश मिळालेले असल्याने भाजपने पॅनेल उभे करणे टाळले आहे. हवेलीत बाजार समितीला संधी असतानाही भाजपने राष्ट्रवादीशी युती करून संधीसाधूपणाचा डाग लावून घेतला आहे.

जिल्ह्यात भाजपला 2014 नंतर 2022 ला सत्तेत सहभागी होण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. अशा वेळी भाजपला सत्तेतून पक्ष विस्ताराची मोठी संधी उपलब्ध झाली होती. मात्र पक्षाने सामान्य कार्यकर्त्यांची सामाजिक हिताशी निगडित कामे सोडाच, पण कार्यकर्ते हे जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या भेटीसाठी ताटकळत राहिल्याची अवस्था आहे. तर विधानसभेच्या रांगेतील इच्छुकांंना आर्थिक ताकदीचे पदाधिकारी घडविण्यात अधिक रस असल्याने सामान्य कार्यकर्ते हे जनतेच्या निष्ठेच्या सवालांनी बेजार झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT