पुणे: सराइत चोरट्याला जामीन देण्यासाठी लष्कर न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा प्रकार वानवडी पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बनावट आधार कार्ड, शिधापत्रिका अशी बनावट कागदपत्रे जप्त केली.
संतोष तेलंग (वय 32) आणि इतर सात अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 4 जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर न्यायालयाचे स्थलांतर वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. सराइत आरोपी बच्चनसिंग भोंड याला कोंढवा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.
भोंडविरुद्ध चार गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात भोंडला जामीन मिळवून देण्यासाठी लष्कर न्यायालयातील एका वकिलामार्फत तेलंग आणि साथीदारांनी बनावट कागदपत्रे सादर केली. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली, तेव्हा बनावट आधारकार्ड, शिक्षापत्रिका सापडल्या. चौकशीत बनावट कागदपत्रे सादर करून जामीन मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला.
तेलंग याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत बनावट कागदपत्रे सापडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टोणे तपास करत आहेत.