पुणे

धामणीत ज्येष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून जबरी चोरी

अमृता चौगुले

मंचर/लोणी धामणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील धामणी येथील जाधवमळ्यात अज्ञात तीन चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून गोविंद भगवंत जाधव (वय 77) व नंदा गोविंद जाधव (वय 70) या ज्येष्ठ दांपत्याचे हातपाय बांधून धक्काबुक्की करत चाकूचा धाक दाखवून एकूण सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज गुरुवारी (दि. 16) पळविला. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे.

धामणी येथील जाधवमळा-द्रोणागिरी येथील पोंदेवाडी रस्त्यावर गोविंद जाधव यांचे घर आहे. जवळ दुसरे कोणतेच घर नाही. गोविंद जाधव व पत्नी नंदा हे दोघेच राहतात. हे हेरून रात्री सुमारे साडेअकरा वाजता अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाला लाथ मारून दरवाजाची कडी तोडून आत येऊन या ज्येष्ठ दांपत्याचे हातपाय बांधले.

त्यांना चाकूचा धाक दाखवत धक्काबुक्की करत धमकावून गोविंद जाधव यांच्याकडील एक दीड तोळ्याची सोन्याची अंगठी व दुसरी अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी, पत्नी नंदा यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी व अर्धा तोळेचा कानातील दागिना, एक नथ तसेच घरातील रोख पाच हजार रुपये असा एकूण सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून पोबारा केला. चोरट्यांनी जाताना जाधव यांच्या मोबाईलमधील बॅटरी काढून घेतली. घराला बाहेरून कुलूप लावून घराच्या लाइटची वायर तोडून चोरटे पसार झाले.

दरम्यान, शुक्रवारी (दि. 17) सकाळी सहाच्या सुमारास काही अंतरावर घर असलेले सुनील जाधव यांना गोविंद जाधव यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जाऊन पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहे.

लकी ड्रॉच्या कूपनसाठी आले होते दोघे
गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोघे अनोळखी तरुण लकी ड्रॉचे कूपन विकण्याच्या बहाण्याने जाधव यांच्या घरी आले होते. कदाचित त्यांनी त्या वेळी घराची पाहणी केली असावी. घरात दोघांशिवाय दुसरे कोणी नाही. जवळपास दुसरे घरदेखील नाही. हे हेरूनच चोरट्यांनी चोरी केल्याचे जाधव कुटुंबीयांनी सांगितले .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT