पुणे

सुरक्षित ऊस वाहतुकीसाठी वाहनांवर रिफ्लेक्टर बसवा, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या सूचना

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गाळप हंगाम 2022-23 करिता साखर कारखान्यांवर ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर-टेलर, बैलगाड्या, अंगद-जुगाड गाड्या व ट्रक या वाहनांना रिफ्लेक्टर बोर्ड बसविण्याची कार्यवाही ऊस वाहतूक करणार्‍या वाहन मालकांकडून करून घेण्याच्या परिपत्रकीय सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या आहेत. ज्याद्वारे अपघातविरहित आणि सुरक्षित ऊस वाहतुकीबाबत ऊस वाहतूकदार वाहनमालक व चालकांना प्रबोधन करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना महामार्गावर जात असताना ज्या महामार्गावर सर्व्हिस रोड आहेत, तेथे सर्व्हिस रोडचा वापर करण्यास, तसेच ज्या महामार्गावर सर्व्हिस रोड नसेल, त्याठिकाणी महामार्गाचा वापर करावा. ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळेत ऊस वाहतूक करतात. काही वेळेला रात्रीच्या वेळी वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात, परंतु वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे इतर वाहनचालकांना जवळ गेल्याशिवाय रस्त्यात नेमके काय थांबले आहे, याचा अंदाज येत नाही. अशा वेळेस अचानक नजरेस न पडलेल्या वाहनांमुळे वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होतात.

राज्यातील ऊस गाळप हंगाम 2022-23 सुरू झालेला आहे. ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना पुढे व मागे रिफ्लेक्टिव्ह टेप न लावणे, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून उसाची वाहतूक करणे, मागील वाहने पाहण्यासाठी आरसे न लावणे, मोठ्या आवाजामध्ये वाहनांमध्ये म्युझिक सिस्टम लावणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वाहने रस्त्याच्या कडेला उभी करणे व वाहनाच्या बॉडीबाहेर ऊस भरणे, शेतातून मुख्य रस्त्यावर इतर वाहनांचा अंदाज न घेता ट्रॅक्टर ट्रेलर आणणे इत्यादी कारणांमुळे अपघात होऊ शकतात. हे टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना सहकारी व खासगी कारखान्यांना देण्यात आल्या आहेत.

रिफ्लेक्टर नसल्यास वाहनधारकास व मालकास दंड
साखर कारखान्यांवर ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिफ्लेक्टर बोर्ड व रिफ्लेक्टिव टेप बसविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. या रिफ्लेक्टर बोर्ड ट्रेलरला मागील बाजूस लाल रंगाचा अखंड व डाव्या आणि उजव्या बाजूस पिवळ्या रंगाचा तसेच पुढील बाजूस पांढर्‍या रंगाचा रिफ्लेक्टर बोर्ड बसविणे बंधनकारक आहे. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. रिफ्लेक्टर नसल्यास कायद्यानुसार वाहनधारकास व मालकास दंड होऊ शकतो, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT