पुणे; पुढारी वृत्तसेवा : फुटबॉल वर्ल्डकपमुळे शहरात फुटबॉलचा फिव्हर वाढला आहे. परंतु, फुटबॉल नक्की कुठे खेळता येऊ शकतो किंवा कोणत्या मैदानावर फुटबॉल खेळला जातो, याबाबत खेळाडूंना माहिती नसते. या सर्वाचा आढावा दै. 'पुढारी'च्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी म्हणाले, शहरात विविध ठिकाणी तब्बल 284 फुटबॉल क्लब अस्तित्वात आहेत. त्यामध्येच आता काही ठिकाणी अकादमीही सुरू झालेल्या आहेत.
मुंबई शहरात सर्वात जास्त 350 फुटबॉल क्लब असून त्यापाठोपाठ पुणे शहराचा दुसरा क्रमांक महाराष्ट्रात आहे. या क्लबमधून अनेक खेळाडू पुढे येत असून सहा वर्षापासूनच खेळाडू फुटबॉलचे प्रशिक्षण घेताना दिसून येतात. असोसिएशनच्या माध्यमातून 6 वर्षांखालील, 8 वर्षांखालील, 10 वर्षांखालील, 12 वर्षांखालील, 14 वर्षांखालील, 16 वर्षांखालील आणि खुला गट असे संघ रजिस्टर असून महिलांसाठीचे तब्बल 22 संघ विविध वयोगटांमध्ये नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये 6 ते 10 वयोगटातील संघांमध्ये मुले आणि मुली असे मिश्र प्रकारात फुटबॉल खेळविला जातो.
पूर्वी केवळ पूर्व भागातच फुटबॉलचे वर्चस्व होते. इतर भागात फुटबॉल खेळला जात नव्हता. परंतु, आता हडपसर, शिवाजीनगर, कॅम्प, धनकवडी, कोथरूड आदी भागातूनही क्लब पुढे आलेले आहेत. या सर्व क्लबच्या माध्यमातून खेळाडूंना योग्य प्रशिक्षण मिळू शकते. तर शहरातील स. प. महाविद्यालय, शाहू कॉलेज, वॉडिया कॉलेज, मुकुंदनगरमधील महाराष्ट्रीय मंडळ, मनपाचे ढोबरवाडी येथील मैदान या खेळासाठी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर बावधन आणि मारुंजी येथील खासगी फुटबॉल मैदानेही उपलब्ध असल्याचे चौधरी यांनी यावेळी सांगितले.