पुणे

मंचर : अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा

अमृता चौगुले

मंचर; पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी रस्ते अपघातात लाखो जीव जातात. अनेकांना अपंगत्व येते. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे, याचे भान ठेवून अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळून प्रवास करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक शरद देशमुख यांनी केले.

तांबडेमळा- मंचर (ता. आंबेगाव) येथे वाहन चालक चाचणीप्रसंगी आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमात देशमुख बोलत होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक अनिल वैरागडे, गौरी रासकर, प्रकाश खामकर, सचिन नाटे, आकाश वर्पे, वसंतराव शिंदे, पांडुरंग शिंदे, अ‍ॅड. शुभांगी पोटे यांच्यासह शिकाऊ वाहनचालक उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, की थोड्याशा समजुतीने अपघाताची शक्यता खूप कमी केली जाऊ शकते. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये. मोबाईलवरील बोलणे टाळावे. लांब पल्ल्याचा प्रवास रात्री टाळावा. थकवा किंवा रात्री गाडी चालवताना झोप आल्यास वाहन बाजूला उभे करावे. दुसरा चालक सोबत असावा.

आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातील शाळा व महाविद्यालयामध्ये रस्त्यावरील सुरक्षित प्रवास याबाबत जनजागृतीचे काम डिसेंबरपासून सुरू केले जाणार आहे, असे शरद देशमुख यांनी सांगितले. दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालावे, कारचालकांनी सीटबेल्ट लावावा. वाहनांची वेग मर्यादा पाळावी. तासन् तास वाहन चालवू नये. प्रत्येक तीन तासांनी थोडे थांबावे. अधिक धुके व मुसळधार पावसात गाडी चालवू नये. सिग्नलचे उल्लंघन करू नये. विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये. वळताना इंडिकेटर सुरू ठेवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

SCROLL FOR NEXT