बदलापूरमध्ये शाळेतील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये विशाखा समिती आणि सखी-सावित्री समिती तयार करण्यात येणार आहे. या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही समित्या आता विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तत्पर राहणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांमध्ये सखी-सावित्री समिती स्थापन करण्यात यावी, अशी घोषणा मार्च 2022 मध्येच केली होती. परंतु, बदलापूरच्या घटनेनंतर आता राज्यातील सर्व शाळाांमध्येच मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरणनिर्मितीसाठी ‘सखी सावित्री’ समितीचे गठन केले आहे का नाही, याची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी होणार्या लैंगिक छळांच्या तक्रारीसाठी असलेली विशाखा समिती आता शाळांमध्ये देखील स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी राज्यस्तरीय सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्यात येणार असून, शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागातीलच सात अधिकार्यांचा देखील समावेश केला जाणार आहे.
कार्यालयांप्रमाणेच शाळांमध्येही आता विशाखा समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी मंगळवारी जाहीर केले आहे. यामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थिनींचाही समावेश असेल. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी 2005 साली तयार केलेल्या विशाखा गाइडलाइन्सला त्याच वर्षी कायद्याचे स्वरूप दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी विशाखा समिती बंधनकारक आहे.
शाळेच्या व्यवस्थापन समितीचे म्हणजेच मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष
शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी
समुपदेशक
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला)
अंगणवाडीसेविका
पोलिस पाटील
ग्रामपंचायत सदस्य (महिला)
पालक (महिला)
शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी
(2 मुलगे, 2 मुली)
समितीचे सचिव शाळेचे मुख्याध्यापक
परिसरातल्या सगळ्या मुलांची शाळेमध्ये नोंदणी करणे आणि त्यांची 100 टक्के उपस्थिती राहील, यासाठी प्रयत्न करणे
स्थलांतरित पालकांच्या आणि शालाबाह्य असणार्या मुलांचे सर्वेक्षण आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे
विद्यार्थ्यांचा शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक विकास, त्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे समुपदेशन
सजग पालकत्वासाठी कार्यशाळांचे आयोजन
शाळेत समतेचे वातावरण राहावे, यासाठी लिंगभेदविरहित
आणि सर्वसमावेशक उपक्रम राबविणे
विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत, असे निकोप वातावरण निर्माण करणे
शासकीय योजनांची माहिती देऊन अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे
डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य शिबिर आणि आरोग्य समुपदेशन
बालविवाह, त्याच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण करणे, बालविवाह रोखण
सामाजिक, आर्थिक, भौगोलिकदृष्ट्या वंचित आणि दुर्बल घटकांमधल्या मुलांच्या शिक्षणासाठी सीएसआरच्या माध्यमातून मदत