पुणे : आशियातील उदयोन्मुख देशांबरोबर काम करण्यासाठी संपूर्ण जग आज उत्सुक आहे. भारताकडेदेखील हे जग एक पारदर्शक, नियमांवर आधारित अर्थव्यवस्था, साखळी-पुरवठा क्षेत्रातील एक भक्कम व विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहत आहे, असे मत केंद्रिय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र मंत्रालय (एमईए) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील हॉटेल जेडब्ल्यू मॅरिएट येथे 23 ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान एशिया इकोनॉमिक डायलॉग (एईडी) 2023 ही भू-अर्थशास्त्र परिषद आयोजित करण्यात आली.
या परिषदेच्या समारोप सत्रात गोयल बोलत होते. एशिया अॅन्ड द इर्मजिंग वर्ल्ड ऑर्डर ही या एईडी 2023ची संकल्पना होती. एशिया इकोनॉमिक डायलॉगच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर होत्या. जेष्ठ शास्त्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी समारोपपर भाषण केले. परिषदेच्या आयोजन समितीचे नेतृत्व एईडीचे संयोजक अॅम्बॅसिडर गौतम बंबावले यांनी केले. परिषदेच्या उद्घाटन सत्रात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, भूतानचे अर्थमंत्री लिओंपो नामगे शेरिंग आणि मालदिवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीर सहभागी झाले होते.