इनामगाव येथे शुक्रवारी साडेबारा ते शनिवारी पहाटे दोनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या वेळी चोरट्यांनी दोन घरांतून एकूण 15 हजारांची रोकड आणि दागिने लंपास केले. तर ग्रामस्थांच्या सतर्कतेने पाच घरांतील चोरीचा प्रयत्न फसला. या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इनामगाव (ता. शिरूर) येथे शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शिवाजी जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून पाच हजार रुपयांचा रोकड चोरून नेली. त्याचबरोबर संदीप उंडे यांच्या घरात प्रवेश करून दोन ग्रॅम वजनाचे पैंजण, गळ्यातील बदाम व रोख दहा हजार रुपये लंपास केले.
तसेच किसनराव बोरकर, शामराव वाळुंज, लक्ष्मण शिंदे, शंकर घाडगे, नंदकुमार घाडगे यांच्या घराचे दरवाजे तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला. या घटनेची माहिती समजताच मांडवगण फराटा पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार रमेश कदम, पोलीस हवालदार अमोल गवळी, अशोक शिंदे, किशोर वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
मांडवगण फराटा येथे गेल्या आठ दिवसांपूर्वी चोरी झाली होती. त्यानंतर चोरी करण्याची ही दुसरी घटना इनामगाव येथे घडली. एकीकडे बिबट्याची धास्ती, तर दुसरीकडे चोरांची भीती यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. याचा फायदा चोरटे घेत आहेत. अनेकजण शेतात जाण्यास घाबरतात. त्यामुळे भुरटे चोर बिनधास्तपणे वाड्या-वस्त्यांवर आता फिरू लागले आहेत.
ग्रामीण भागात गस्त वाढविण्याची मागणी
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या लागल्या असून, या दिवसांत चोर्या रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रत्येक गावात जास्तीत जास्त गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थसांनी केली आहे.