पुणे

पुणे : निवडणुकीपूर्वी गूळ-भुसार बाजारात; अवैध बांधकामांचा सुळसुळाट!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे बाजार समितीच्या गूळ-भुसार बाजारात निवडणुकीपूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली अवैध बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. भरदिवसा तोडफोडीचे काम सुरू असताना बाजार समितीचा सुरक्षा विभागच अवैध बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गूळ-भुसार विभागात व्यापार्‍यांना भूखंडांचे भाडेपट्ट्याने वाटप केले आहे. त्यावर नवीन बांधकाम, मूळ नकाशातील बांधकामात बदल आदींसाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते.

मात्र, गूळ-भुसार बाजारात कमलकिशोर आणि कंपनी या भूखंडधारकाने दुरुस्तीच्या नावाखाली बेकायदा साइडपट्टीसह मूळ बांधकामात बदल केले. साइडपट्टीत बांधकाम न करण्याचे आदेश असताना त्याच कामाला हात घातला आहे. हे बांधकाम चेंबरच्या एका संचालकाचे असल्याची चर्चाही बाजारात आहे. दरम्यान, स्थापत्य विभागाने संबंधित बांधकामाला परवानगी दिलेली नाही. एखाद्या बांधकामास परवानगी दिल्यास त्या कामाबाबत भुसार व सुरक्षा विभागप्रमुखांना अवगत केले जाते.

बाजारात बांधकामे सुरू असल्यास ती परवानगी घेऊन सुरू आहेत की अवैध, याची खातरजमा करण्याची व परवानगी नसल्यास ती थांबविण्याची जबाबदारी सुरक्षा विभागाकडे असल्याचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद तुपे यांनी सांगितले. सुरक्षा विभागप्रमुख सोमनाथ बोरकर यांना अवैध बांधकामाबाबत विचारले असता माहिती नसल्याचे सांगत अवैध काम सुरू असल्यास ते बंद केले जाईल, असे सांगितले.

SCROLL FOR NEXT